सैनिकी शिक्षण म्हणजे केवळ शिस्त नव्हे, आयुष्याला दिशा देणारी प्रेरणा आहे” — बिपीन कोल्हे
“Military education is not just discipline, it is inspiration that gives direction to life” — Bipin Kolhe
संजीवनी सैनिकी स्कूलच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात शिस्तीचा आणि स्नेहाचा संगम
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue27Oct 19.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव, :“एवढ्या शांततेत माजी विद्यार्थी मेळावा पार पडणे म्हणजे संजीवनी सैनिकी स्कूलमध्ये रुजविलेली शिस्त आजही जिवंत आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. सैनिकी शिक्षण हे केवळ शिस्त नव्हे, तर आयुष्याला दिशा देणारी प्रेरणा आहे,” असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.
संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजतर्फे नुकताच माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात सुमारे २५० माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावून आपापल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये पंतप्रधान कार्यालयाचे सुरक्षा अधिकारी, भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर, उपजिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, वैद्यकीय अधिकारी आणि प्रगतशील शेतकरी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अमर जवान स्मारकास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य कैलास दरेकर यांनी स्वागतपर भाषणात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
दरेकर म्हणाले, “संजीवनी समूहाचे नितिन कोल्हे, बिपीन कोल्हे,अमित कोल्हे आणि सुमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल अधिक गतिमान होईल.”
बिपीन कोल्हे म्हणाले, “पालक आज आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सैनिकी शाळांची निवड करीत आहेत. अशा संस्था केवळ करिअर घडविण्यासाठी नव्हे, तर जबाबदार नागरिक घडविण्यासाठी अत्यावश्यक आहेत. माजी विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान व अनुभव नव्या पिढीशी वाटून शाळेचे ऋण फेडावे. आयुष्यात ईर्षा नको, तर निकोप स्पर्धा हवी. अडचणींवर मात करून ध्येय गाठा. तुम्हाला जे आवडते ते करा; अन्यथा जे मिळेल ते आवडण्यास भाग पडेल,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
या वेळी सुमित कोल्हे म्हणाले, “माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ही संस्था लष्करी शिक्षणाच्या क्षेत्रात राज्यातील अग्रगण्य केंद्र बनेल.”
माजी विद्यार्थी समीर नरवडे (बजाज ऑटो लि.), रोशन दराडे व उपशिक्षणाधिकारी सुरज वागस्कर यांनी शाळेतील अनुभव शेअर करताना सांगितले, “आमच्या आयुष्याला दिशा देण्याचे कार्य या शाळेने केले. शारीरिक तंदुरुस्ती, कष्टाची सवय, आदर्श जीवनशैली आणि निर्व्यसनीपणाची प्रेरणा संजीवनीतूनच मिळाली.”
मेळाव्याच्या पूर्वसंध्येला संजीवनी ग्रुपचे अध्यक्ष श नितिन कोल्हे यांनी माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मेळाव्याचा समारोप देशभक्तीच्या वातावरणात झाला. अमर जवान स्मारकास मानवंदना देताना माजी विद्यार्थ्यांचे डोळे अभिमानाने चमकले — कारण त्यांनी शिकलेली संजीवनीची शिस्त आणि संस्कार आजही त्यांच्या प्रत्येक पावलात जिवंत आहेत.
Post Views:
107





