निष्ठावंतांचा स्फोट; कोणाचे गणित कोसळणार, कोणाची खुर्ची डळमळणार?

निष्ठावंतांचा स्फोट; कोणाचे गणित कोसळणार, कोणाची खुर्ची डळमळणार?

Explosion of loyalists; whose calculations will collapse, whose chair will shake?

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Fir 21Nov 15.00Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: (राजेंद्र सालकर) नगरपालिकांच्या रणांगणात यंदा एक नवे समीकरण फुलत नाही तर धगधगत आहे. निष्ठावंत विरुद्ध नवीन चेहरा. वर्षानुवर्षे पक्षासाठी रात्रंदिवस राबलेले कार्यकर्ते उमेदवारीत डावलले, आणि ज्यांना प्रभागाची वाटही माहीत नाही असे ताजे चेहरे पुढे येऊ लागले… इथूनच नाराजीचा ज्वालामुखी पेटला.

पक्षाचे पायाभूत कार्य करणाऱ्यांना बाजूला सारून “विजयाची शक्यता” या गोंडस नावाखाली केलेली ही प्रयोगशाळा आता पक्षांच्या अंगावर येतेय. कारण नाराजी हा शांत बसणारा प्रकार नाही; ती गडगडाट करूनच फुटते. काही निष्ठावंतांनी सरळ पक्षांतराची वाट धरली, तर काही “अपक्ष” म्हणून जनतेसमोर उभे राहण्याची तयारी करत आहेत. आणि हा स्फोट कुठे होणार याचा ताळमेळ कोणत्याही पक्षाकडे दिसत नाही.

या रागाची सर्वात मोठी भीषणता म्हणजे मतांची विभागणी. थेट नगराध्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीनंतर प्रत्येक मताला वजन मिळालंय. म्हणूनच एखाद्या प्रभागात उठलेली नाराजीची लहर धग सरळ नगराध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकते. मोठे पक्ष सध्या ‘डॅमेज कंट्रोल’च्या मोडमध्ये आहेत. फोन कॉल, बैठक, आश्वासने, समंजसपणाचे प्रयोग… पण विश्वास तुटला की गाठ लागतेच. आणि ती गाठ तुटवायला निवडणुकीतील चार दिवस अपुरेच पडतात.

दुसरीकडे, शिवसेनेचे चित्र तर अधिकच गोंधळात टाकणारे. तीन सावता सुभे – तीन वाटा, एकच वारसा

शिवसेनेची पारंपारिक मते एकेकाळी एकाच ध्वजाखाली एकवटत. आज तीच मते तीन तुकड्यांत विभागली आहेत.उद्धवांची शिवसेना भावनिक निष्ठेवर उभी,शिंदे गट सत्तेच्या आधारावर ‘खरा वारस’ असल्याचा दावा करणारा,आणि तिसरा गटभाजपसोबत स्थैर्याचे राजकारण दाखवणारा.पण मतदार भावनिक असला तरी गोंधळलेला आहे; तीन सावता सुभ्यांमध्ये ‘आपला कोण?’ हा प्रश्न त्याला सतत टोचतो आहे.या तिहेरी चौकटीत कोण उभारी घेईल आणि कोणाचे संपूर्ण गणित कोसळेल,हे मतपेटीच ठरवणार.पण एक गोष्ट मात्र निर्विवाद,शिवसेनेची मते फुटत आहेत, आणि ही फुट दोन्ही बाजूंनी धारदार अशी‌ दोन्ही बाजूंना जखम करणारी आहे.

शेवटी  अंतिम प्रश्न नाराजीचा बूमरँग कोणावर?

निष्ठावंतांच्या मनात जमा झालेला राग हा या निवडणुकीतील सर्वात धोकादायक मतदार ठरणार आहे.तो नगराध्यक्ष उमेदवाराला बसणार?की निष्ठावंतांच्या जागी आलेल्या नव्या चेहऱ्याला?
की तीन तुकड्यांत विभागलेल्या शिवसेनेपैकी कोणाला?उत्तर सध्या धुसर आहे.पण एक गोष्ट मात्र नक्की या निवडणुकीत प्रचार, पैसे, पोस्टर नाही…नाराजी ठरवणार निकाल. थोडक्यात काय तर.या सगळ्या गोंधळात  या निवडणुकीचा खरा ‘किंगमेकर’ मतदार नाही, तर नाराजी आहे. ज्याने निष्ठावंतांचे मन राखले, त्याचे गणित जमेल.आणि जे त्यांना विसरले, त्याच्या मतपेटीतूनच स्फोटाचा आवाज येणार तोही असा, की संपूर्ण राजकीय गणितालाच हादरा बसेल.!

Leave a Reply

You cannot copy content of this page