कोपरगावात कमळाची जंगी महागर्जना! फडणवीसांचा थेट इशारा
Lotus’s war cry in Kopargaon! Direct warning from Fadnavis
“आता मतांची चूक नको… विकासाचं बटण कमळच!”
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue 25Nov 19.30Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगावात भाजप–रिपाई–मित्रपक्षांच्या शक्तिप्रदर्शन सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रखर गर्जना झाली आणि मैदान अक्षरशः टाळ्यांच्या गडगडाटाने दणाणून गेलं. सोमवारच्या सभेला उसळलेली प्रचंड गर्दी पाहताच फडणवीसांनी सुरुवातीलाच रोखठोक विधान केलं,“ही गर्दीच सांगते… कोपरगावाने कमळावर शिक्कामोर्तब केलं आहे!”
सभेला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विवेक व बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार विक्रम पाचपुते, तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान आणि सर्व प्रभागातील उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक विवेक कोल्हे यांनी केले माजी आमदार स्नेहलता कोल्हे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची जोरदार भाषणे आणि मुख्यमंत्र्यासमोर व्यासपीठावर एकमेकांवर फटकेबाजी झाली.
महिलांसाठी स्पष्ट आश्वासन देत फडणवीस म्हणाले—“कोण काय म्हणतं म्हणू दे… पण जोपर्यंत तुमचा ‘देवा भाऊ’ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत कोणत्याही योजनेवर गदा येणार नाही! विरोधकांच्या धमक्या लोकांनीच नाकारल्या.”
या वक्तव्यावर महिलांकडून भरघोस प्रतिसाद उमटला.
शहर विकासाचा संपूर्ण आराखडा सभेत मांडताना त्यांनी सांगितले की, कोपरगावातील पाणीपुरवठा, गटारव्यवस्था, रस्ते, गृहनिर्माण, अतिक्रमण पुनर्वसन, आरोग्य सेवा या सर्व प्रश्नांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी तयार आहे.“अमृत–अटल योजना असो, स्मार्ट पाणीपुरवठा असो किंवा गृहनिर्माण—सगळं सुरू करण्यासाठी सक्षम, पारदर्शक पालिका हवी. आणि ती देऊ शकते ती फक्त कमळाचीच टीम!” असे त्यांनी ठासून सांगितले.
अतिक्रमण केलेल्या वस्तीतील नागरिकांना दिलासा देताना त्यांनी जाहीर केले.“ज्यांची अतिक्रमणे नियमित झाली, त्यांना पक्कं घर मिळणारच! हा शब्द सरकारचा आहे.”
तसेच आयुष्यमान मंदिरांतून मोफत डॉक्टर–औषध सेवा, आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ५ लाखांपेक्षा मोठे उपचारही मोफत देण्याची हमीही त्यांनी दिली.
सभेच्या अखेरीस मतदारांना स्पष्ट इशारा देत फडणवीस म्हणाले,“मागच्या निवडणुकीत ५०० मतांची चूक झाली… त्या एका चुकीचा मोठा फटका शहराला बसला. यावेळी नगराध्यक्षही आपलाच, पॅनलही आपलं—एकही मत भरकटू देऊ नका!”
कोपरगावातल्या या अभूतपूर्व गर्दीमुळे भाजप–रिपाई–मित्रपक्षांच्या तळात जबरदस्त उत्साह निर्माण झाला आहे. मतदानाच्या तोंडावर शहरात “कमळाच्या लाटेची” चर्चा चांगलीच रंगली असून विरोधकांच्या खांद्यावर दबाव वाढल्याची राजकीय वर्तुळातील चर्चा आहे..कोपरगावच्या विकासयात्रेला वेग देण्यासाठी भाजपचा विजय अनिवार्य असल्याचा ठाम संदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी आमदार कोल्हे यांनी सभेत दिला. जिल्ह्यातील पहिल्याच प्रचारसभेला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगत विखे म्हणाले की १०० पेक्षा अधिक जागा बिनविरोध आणणाऱ्या भाजपसमोर आता कोपरगाव नगरपालिका विक्रमाची वाट पाहत आहे. फडणवीस सरकारमुळे संरक्षण उत्पादन क्लस्टर, शिर्डी इंडस्ट्रियल इस्टेट, निळवंडे प्रकल्प यांसारखी महत्त्वाची कामे मार्गी लागली, तर कोल्हे यांनी नगरपालिकेपासून पोलिस स्टेशनपर्यंत, सब-स्टेशनपासून रेल्वे स्टेशनपर्यंत मिळालेल्या निधीची उजळणी केली. गरीब, शेतकरी, महिला, युवकांसाठी झालेली मदत अधोरेखित करत त्यांनी निवडणुकीत भाजपला मतदान करून कोपरगावच्या विकासाला गती देण्याचे आवाहन केले.
विवेक कोल्हेंचा थेट टोमणा
व्यासपीठावर तीन मंत्री असताना विवेक कोल्हेंनी विखेंकडे रोखठोक बाण सोडला,“दोन मंत्री आपल्यावर प्रेम करतात… पण मुख्यमंत्री तर आपल्यावर खास प्रेम करतात एखाद्या मंत्र्याचे प्रेम कमी पडले तर ती भर मुख्यमंत्र्यांचे प्रेमानं भरून निघेल हा टोमणा जरा गोड, जरा कडू… पण निशाणा मात्र सरळ राधाकृष्ण विखेंवरच!
स्नेहलता कोल्हेंकडून काका कोयटे यांची उघडीपणे पोलखोल
स्नेहलता कोल्हेंनी काका कोयटे यांचा दुटप्पीपणा मंचावरच चिरडला.अमित शहांच्या दौऱ्याचा किस्सा सांगत त्यांनी थेट म्हटलं,“फोन करून म्हणतात—‘ताई, लोणीचा कार्यक्रम नीट झाला नाही, त्यापेक्षा आपला कार्यक्रम जोरात झाला विवेक भैय्यांची दृष्ट काढा!’एकीकडे तुमच्यासोबत बसायचं, आणि दुसरीकडे टीका करायची हीच त्यांची प्रवृत्ती असं म्हणत त्यांनी विखेंच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्नच केला.
विवेक–स्नेहलताच्या टीकेला राधाकृष्ण विखेंची धारदार प्रत्युत्तराची धमकी
कोल्हे माता पुत्र यांनी मंचावरून केलेल्या चपराकींना पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी अगदी मामाला बोलण्याचा भाचीला अधिकार आहे. परंतु राजकारणात उतावळेपणा चालत नाही “मला आका म्हणा, बोका म्हणा, काका म्हणा…संयम माझी खूण!पण वेळ आली तर उत्तर देण्यात मी मागे पडणार नाही—हे तुम्हाला चांगलं माहित आहे!”
अहिंसास्तंभ पार… भाकीत मात्र कोसळलं!






