कोपरगाव निवडणूक : थंडावलेल्या रणांगणात पुन्हा धुराळा, पुन्हा पेटला निवडणुकीचा रणसंग्राम
Kopargaon Election: The battleground that had cooled down has once again become a hotbed, the election battle has flared up again
दोनदा माघार, दोनदा चिन्ह, दोनदा प्रचार… आयोगाची ‘वन प्लस वन फ्री’ ऑफर
कोणाची शह कोणाची मात कोण होणार “वजीर”
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue 9Dec 17.30Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव:(राजेंद्र सालकर) नगरपरिषदेची थंडावलेली निवडणूक पुन्हा एकदा तापू लागली आहे.न्यायालयीन प्रक्रियेत अडकून थबकलेल्या २४ नगरपरिषदांपैकी कोपरगावही एक. प्रचाराचा ताप उच्चांकीवर पोहोचला असतानाच निवडणूक आयोगाच्या एका आदेशाने सगळे बटण ऑफ झालं… बोर्ड खाली, बॅनर खाली, आणि उमेदवारांची हवा देखील खाली, आरोप–प्रत्यारोपांच्या तलवारी परत म्यानात, तर चौका चौकात प्रचाराच्या धडाडणाऱ्या तोफा निकामी झाल्या.

आठवडाभर निवडणुकीचे रणांगण अक्षरशः बर्फ झाले होते. चौकातील बॅनर उतरले, गल्लीबोळातील भोंगे शांत झाले आणि कट्ट्यांवरील राजकीय चर्चा शेकोटीसमोरही तापली नाही. उमेदवारांची अवस्था ‘दे माय धरणी ठाय’ काम करून घ्या, आणि ऐनवेळी सांगा “पुन्हा सुरुवातीपासून करावं लागेल”! शहरात अशी शांतता पसरली की कुणी चकार शब्द बोलायलाही तयार नव्हतं.
आता मात्र नवीन वेळापत्रक जाहीर होताच पुन्हा धांदल सुरु, दहा तारखेची माघार व ११ तारखेचे चिन्ह वाटप जवळ येताच एकेक बॅनर पुन्हा चढू लागले, भोंगे परत वाहनावर बसू लागले आणि सोशल मीडियावरील पोस्टला देखील नवी पालवी फुटली. कडाक्याच्या थंडीतही निवडणुकीचा पारा मात्र फुलत चालला आहे.
उमेदवारांचं दुबार भाग्य बघायला मिळाले दोनदा माघार, दोनदा चिन्ह, दोनदा प्रचार, दोनदा आर्थिक पेरणी… एवढं सगळं एकाच निवडणुकीत अनुभवायला मिळाल्याने उमेदवार आनंदी आहेत की त्रस्त, हे मात्र त्यांनीच ठरवावं! कारण त्यांची अवस्था म्हणजे सांगता येईल आणि बोलता येईल अशी झालेली. पण शहरात चर्चा जोरात “आयोगाने पाच वर्ष लांबलेली निवडणूक एकदम डबल धम्माल करून परतफेड केली!”
थंडीने गारठलेले उमेदवार आता पुन्हा जोशात,दंड थोपटून मैदानात उतरलेत. या थंड-गरम खेळात कोण माघार घेणार यावर अनेकांचे अंक गणित बदलणार. काहींचे मनोबल कोसळले, तर काहींनी ही आपत्ती संधी समजून आपला उरलेला प्रचार पुन्हा चकाकवून घेतला. निवडणुकीचे चित्र बदलणार यात शंका नाही.
एकंदरीत, कोपरगावची निवडणूक पुन्हा पेटली आहे. उरलं-सुरलं हिवाळ्याचं गारूड बाजूला सारून राजकारणाच्या शेकोटी पुन्हा धगधगू लागल्या आहेत… आणि शहर मात्र म्हणतंय—
“रणांगण सजलंय…नगरपालिका निवडणुकीच्या सरीपाटावर पुन्हा नवा डाव मांडला जात आहे. आता पाहू, “कोणाचा शह कोणाची मात” ! कोण होणार शहराचा “वजीर”
Post Views:
43






