कोपरगावच्या विकासासाठी राष्ट्रवादीची सत्ता गरजेची – सौ. चैताली काळे

कोपरगावच्या विकासासाठी राष्ट्रवादीची सत्ता गरजेची – सौ. चैताली काळे

NCP rule is necessary for the development of Kopargaon – Mrs. Chaitali Kale

महिलांचे स्वावलंबन हा आमचा निर्धार

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनTue 16Dec 20.00Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :कोपरगावच्या लाडक्या बहिणींनी २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांना भरघोस मतांनी विजयी करून विश्वास व्यक्त केला आहे. त्या विश्वासातून उतराई होण्यासाठी कोपरगाव मतदारसंघासह कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास इतर प्रगत शहरांच्या बरोबरीने करण्याचा निर्धार असून, त्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचे आवाहन जिल्हा बँकेच्या मा. संचालिका सौ. चैताली काळे यांनी केले.

कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ०५ मध्ये आयोजित कॉर्नर सभेत नागरिकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी महिला भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

सौ. चैताली काळे म्हणाल्या की, कोपरगावकरांना अपेक्षित असलेला विकास आमदार आशुतोष काळे यांनी करून दाखवला आहे, हे नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. मात्र नगरपालिकेची सत्ता नसल्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासात येणाऱ्या अडचणीही कोपरगावकरांनी अनुभवल्या आहेत. कोपरगाव शहराच्या विकासासाठी अनेक दूरदृष्टीपूर्ण संकल्पना आमदार आशुतोष काळे यांच्याकडे असून त्या प्रत्यक्षात साकार करण्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी सक्षम, अभ्यासू व समाजाशी नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून काकासाहेब कोयटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काकासाहेब कोयटे हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, कोपरगावकरांच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी असतात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी ‘समता उद्योग मंदिर’ उभारून ठोस कृती केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो महिलांना अगरबत्ती, मेणबत्ती, कापूर, दिव्यांच्या वाती यांसारख्या दैनंदिन वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन घरबसल्या रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव कोपरगावकर प्रत्यक्ष अनुभवत आहेत.

महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून, महिलांसाठी उद्योग, स्वयंरोजगार व स्वावलंबनाच्या संधी निर्माण करण्याची खरी ताकद आमदार आशुतोष काळे यांच्याकडे आहे. त्यांच्या विकासदृष्टीतून कोपरगाव शहर समृद्ध होत आहे. २३ दिवसांनी येणारे पाणी आता ४ दिवसांनी मिळत असून ते नियमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चांगले रस्ते, स्वच्छ व सुंदर शहर, सक्षम आरोग्य सुविधा आणि सुरक्षित भविष्य देण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमतासह सत्ता द्यावी, असे आवाहन सौ. चैताली काळे यांनी केले.

चौकट : महिलांचे स्वावलंबन हा आमचा निर्धार

कोपरगावच्या महिलांना स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसर आणि उत्तम आरोग्य सुविधा देतानाच, उद्योग मंदिराच्या माध्यमातून त्यांच्या हाताला रोजगार देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. कुटुंबाला योग्य दिशा देणाऱ्या महिला स्वतःचा उद्योगही समर्थपणे सांभाळू शकतात, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.— काकासाहेब कोयटे

Leave a Reply

You cannot copy content of this page