बदल की परंपरा? कोपरगावच्या रणांगणात झावरे–पुंडेंचा थेट हल्लाबोल!

बदल की परंपरा? कोपरगावच्या रणांगणात झावरे–पुंडेंचा थेट हल्लाबोल!

Change or tradition? Zaware and Punde launch a direct attack in the Kopargaon battleground!

“पाणी, विकास आणि सामान्य माणसाचा हक्क” या मुद्द्यावर सामना रंगला

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSat 13Dec 20.30Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : “पाणी प्रश्न हा केवळ घोषणांचा नव्हे, तर नियोजनाचा विषय आहे. अपूर्ण यंत्रणा, साधनांची कमतरता आणि टोकाचा विरोध असतानाही २००१ ते २००६ या काळात कोपरगावकरांना एक दिवस आड शुद्ध पाणी दिले. विकास हा फक्त बोलण्याचा नव्हे, तर करून दाखवण्याचा विषय आहे. पुन्हा संधी दिली, तर पहिल्यापेक्षा अधिक विकास करून दाखवेन,” असा आत्मविश्वास नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र झावरे यांनी कॉर्नर सभेत व्यक्त केला.

गजानन नगर येथे झालेल्या सभेत महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी विरोधकांवर थेट शब्दबाण सोडले. “आपल्या हक्कासाठी लढणारा, स्वच्छ प्रतिमेचा आणि सामान्य जनतेतून आलेला उमेदवार हवा असेल, तर झावरे यांनाच निवडून द्यावे लागेल. शहरावर बळजबरीने लादलेले काका–साहेबांचे पंचतारांकित राजकारण आता कोपरगावला नको,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
“२००१ सालच्या विकासाची पुनरावृत्ती करण्याची हीच योग्य वेळ आहे,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

विमल पुंडे म्हणाल्या, “राज्यात सत्ता नसतानाही झावरे यांनी कोपरगावचा चेहरा बदलला. शॉपिंग कॉम्प्लेक्स, नेहरू भाजी मंडई, संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज संकुल उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभारले गेले. म्हणूनच कोपरगावकर त्यांना ‘विकासपुरुष’ म्हणतात.”
“शिंदे साहेब रिक्षाचालक होते, झावरेही रिक्षाचालक आहेत—सामान्य माणूसच विकास घडवतो,” असा भावनिक मुद्दाही त्यांनी मांडला.

जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी मात्र अधिकच आक्रमक भूमिका घेतली. “गेल्या ५० वर्षांत सत्ता ठरावीक कुटुंबांत फिरत राहिली. नगराध्यक्षपद बगलबच्च्यांमध्ये वाटले गेले. इतकी सत्ता असूनही आज विकासाचे व्हिजन मांडले जाते, हीच शोकांतिका आहे. ४००० कोटींच्या वल्गना होतात; पण १३१ कोटींची पाणी योजना पाच वर्षांत का पूर्ण झाली नाही?” असा सवाल त्यांनी केला.
“अयोध्येचे राममंदिर आणि समृद्धी महामार्ग वेळेत होतात; पण कोपरगावची पाणी योजना अडकते—हेच अपयश आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र झावरे व प्रभाग क्रमांक १४ मधील शिवसेनेचे उमेदवार शंकर गंगुले, राठोड परीगाबाई, वैभव चव्हाण यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी किरण खर्डे, दिलीप सोनवणे, ॲड. श्रीनिवास डागा, इरफान शेख यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल देशपांडे यांनी केले, तर अध्यक्षस्थान मंगला पवार यांनी भूषवले.

चौकट :
एकीकडे घराणेशाही, वल्गना आणि अपूर्ण योजना—तर दुसरीकडे सामान्यांतून आलेला विकासाचा ठोस दावा. कोपरगावची लढत आता स्पष्टपणे “बदल की परंपरा” या निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. कोणाच्या हाती शहराची सूत्रे द्यायची, याचा निकाल कोपरगावकरच लावणार आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page