आधी वस्तुस्थिती तपासा, मग आरोप करा – सातभाईंचा कोयटेवर पलटवार
First verify the facts, then make accusations – Satbhai retaliates against Koyte.
मर्चंट बँकेवरील आरोपांना सातभाईंचे चोख उत्तर
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed 17Dec 16.10Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :मर्चंट बँकेबाबत काकासाहेब कोयटे यांनी केलेल्या वक्तव्यावर माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी सौम्य पण बोचऱ्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय आकसापोटी संस्थांवर आरोप करणे हे कोपरगावच्या राजकारणाची पातळी खालावणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सातभाई म्हणाले की, मर्चंट बँक ही लहान व्यापारी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांना आर्थिक आधार देणारी संस्था आहे. कोणत्याही संस्थेत चुका होऊ शकतात, त्यावर चर्चा व्हावी; मात्र स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी दुसऱ्यांवर टीका करणे योग्य नाही. वस्तुस्थिती तपासल्याशिवाय आरोप करणे हा राजकीय स्वार्थ असल्याचा सूचक टोला त्यांनी लगावला.
“आम्ही मर्चंट बँकेच्या माध्यमातून अनेक लहान व्यापाऱ्यांना उभे करण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडून चुका झाल्या असतील, तर त्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे आणि त्याची किंमतही मोजत आहोत. मात्र कर्जवसुलीच्या नावाखाली कोणाची बदनामी किंवा अपमान केला नाही,” असे त्यांनी सांगितले. आजही कर्जदार, ठेवीदार आणि सभासद आमच्या पाठीशी उभे आहेत, हेच आमच्या कामाचे प्रमाणपत्र असल्याचे सातभाईंनी नमूद केले.
काही कर्जदारांनी स्वतःच्या संस्थेबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या म्हणून मर्चंट बँकेवर आरोपांची धुळफेक करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. “आधी स्वतःचा आरसा पाहावा, मग इतरांवर टीका करावी,” असा सल्लाही त्यांनी दिला.
बँका नेहमी यशस्वी कर्जदारांची उदाहरणे देऊन प्रेरणा देतात. मात्र थकीत कर्जदारांची नावे जाहीर करून नैतिकतेचे धडे देणे ही सहकारातील चुकीची मानसिकता असल्याची सूचक टीकाही सातभाईंनी केली.
राजकारणात हार-जीत येत असते, असे सांगत त्यांनी २००१ सालच्या निवडणुकीचा संदर्भ दिला. “पराभव झाला तरी आम्ही जनतेप्रती असलेली सामाजिक आणि राजकीय बांधिलकी सोडली नाही. वयोमानानुसार जबाबदारी पुढच्या पिढीकडे दिली; हीच लोकशाहीतील योग्य वाटचाल आहे,” असे त्यांनी सांगत कोयटेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मर्चंट बँकेविषयी खोटी माहिती पसरवून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न कोपरगावचा सुज्ञ मतदार नक्कीच ओळखेल, असा विश्वास संजय सातभाईंनी व्यक्त केला.
Post Views:
21





