राजकीय रंग देऊन,डायलॉगबाजीने प्रश्न सुटत नाहीत – दत्ता काले

राजकीय रंग देऊन,डायलॉगबाजीने प्रश्न सुटत नाहीत – दत्ता काले

Giving a political spin to the issue and resorting to rhetoric will not solve the problem – Datta Kale

राजकीय षडयंत्राचा आरोप नको; स्पष्ट भूमिकेचा सल्ला

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनTue 16Dec 11.10Am.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :कर्जदारांचा आणि संस्थेचा संघर्ष गेल्या पाच-सात वर्षांपासून सुरू आहे. तो वास्तव असताना दुसऱ्यांची नावे घेऊन या विषयाला राजकीय रंग देऊ नका आणि जबाबदारी झटकू नका,” असा स्पष्ट सल्ला भाजपचे माजी शहराध्यक्ष दत्ता काले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काका कोयटे यांना दिला. शहरातील एका कॉर्नर सभेत ते बोलत होते.

समता पतसंस्थेच्या प्रश्नावर बोलताना काले म्हणाले की, “हे प्रकरण अचानक निर्माण झालेले नाही. अनेक वर्षांपासून कर्जदार आणि संस्थेमधील वाद सुरू आहेत. तरीही प्रत्येक प्रश्नाला राजकीय षडयंत्र ठरवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर तो नागरिकांच्या बुद्धिमत्तेचा अवमान ठरेल.”

ये पब्लिक है सब जानती है असे डायलॉग मारून प्रश्न सुटत नाहीत,” असा बोचरा टोमणा संदीप कोयटे यांना लगावत काले यांनी सांगितले की, जनतेला वास्तव माहिती आहे आणि तिला भावनिक विधानांपेक्षा स्पष्ट भूमिका अपेक्षित आहे. “नागरिक भोळे नाहीत. ते घोषणा, डायलॉग आणि आरोप यामधला फरक ओळखतात,” असेही ते म्हणाले.

काले पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी संस्थांच्या प्रश्नांवर संयमित पण ठाम भूमिका घ्यायला हवी. “ठेवीदारांचे हित, पारदर्शक कारभार आणि जबाबदारी निश्चित करणे हेच खरे नेतृत्वाचे लक्षण आहे. जबाबदारी इतरांवर ढकलून प्रश्न सुटत नाहीत,” अशी टीका देखील  त्यांनी केली.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना काले म्हणाले की, कोपरगावला असा नगराध्यक्ष हवा आहे जो केवळ निवडणूक काळात नाही, तर कायम शहराच्या प्रश्नांसाठी उपलब्ध राहील. पाप पुण्याच्या नावाखाली पठाणी वसुली करणारा व्यापारी वृत्तीचा नको तर  विकासासाठी सातत्य, अनुभव आणि प्रामाणिक भूमिका असणारा हवा ” असे काले यांनी स्पष्ट केले.

समता पतसंस्थेच्या ठेवीदारांचा उल्लेख करताना काले म्हणाले, “हजारो नागरिकांनी आपल्या मेहनतीची पुंजी विश्वासाने ठेवली आहे. त्या विश्वासाचे रक्षण करणे हे सर्व संबंधितांचे पहिले कर्तव्य आहे. भावनिक भाषणांपेक्षा ठोस कृती अधिक महत्त्वाची आहे.”

“ही समताची नव्हे, तर नगरपालिकेची निवडणूक आहे. विकासावर बोला,” असा सल्ला देत व्यासपीठावरून उपदेशाची तोफ डागणारे काका कोयटे मात्र भाषण सुरू होताच थेट समता आठवतात. पंचवीस वर्षांत समताच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक-शैक्षणिक कार्याच्या बढाया सुरू होतात. मग प्रश्न उभा राहतो.हे चालते का?

काले यांनी हा मुद्दा थेट आणि तिखट शब्दांत उपस्थित केला. “निवडणूक नगरपालिकेची असेल, तर कामगिरीही नगरपालिकेची दाखवा. समताच्या कामाचं श्रेय घ्यायचं आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत ‘विकास’चा गजर करायचा,ही कुठली नीती?” असा सवाल करतानाच समताचा पंचवीस वर्षांचा पाढा वाचायचा असेल, तर मग क्रेडिट हवं तर झळही सोसायली पाहिजे असा टोला देत  त्यांनी कोयटेंच्या भूमिकेचा वस्तुनिष्ठ पडदा फाश केला

नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार विकास, पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य यांची आकडेवारी विचारतो. तेव्हा उत्तर समताच्या फाईलमधून काढायचं का? “समताची कामं गौरवास्पद असतील तर ती समताच्या व्यासपीठावर मांडा; नगरपालिकेत येताना नगरपालिकेचं विकासाचे चित्र दाखवा,” असा स्पष्ट इशाराही काले यांनी दिला.

दत्ता काले यांच्या या बोचऱ्या पण संयमित वक्तव्यामुळे समता पतसंस्था प्रकरणावर पुन्हा एकदा राजकीय चर्चेला वेग आला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page