चाळीस वर्ष सत्ता असूनही कोपरगावचा विकास झाला नाही – आशुतोष काळे

चाळीस वर्ष सत्ता असूनही कोपरगावचा विकास झाला नाही – आशुतोष काळे

Despite forty years in power, Kopargaon has not been developed – Ashutosh Kale

घोषणांची धूळफेक; कोपरगाव मात्र मागेच – आशुतोष काळेंचा विरोधकांवर घणाघात

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed 17Dec 16.20Am.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :चाळीस वर्षे आमदारकी, वर्षानुवर्षे नगरपालिकेची सत्ता हातात असूनही कोपरगावच्या वाट्याला विकास नाही, फक्त घोषणाबाजी आली,” असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांवर केला. शहरातील प्रभाग क्रमांक १३ तसेच ३ व ४ मधील कॉर्नर सभांमध्ये नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचा पाढा वाचला.

रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, स्वच्छता, आरोग्य सुविधा – हे मूलभूत प्रश्न मुद्दाम प्रलंबित ठेवून त्याच प्रश्नांवर वर्षानुवर्षे राजकीय पोळी भाजली गेली, असा आरोप काळे यांनी केला. “नागरिकांच्या रोजच्या अडचणींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे कोपरगावचा विकास रखडला. शहर विकासाच्या बाबतीत खूप मागे फेकले गेले,” असे ते म्हणाले.

आपल्या कामाची पद्धत स्पष्ट करताना काळे म्हणाले, “मी केवळ आश्वासन देत बसत नाही. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करतो. अनेक प्रश्न प्रत्यक्षात सोडवले आहेत.” कोपरगावला पाणी, चांगले रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधा देणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

“टीका-आरोपांचे राजकारण न करता प्रत्यक्ष कृतीतून विकास साधायचा आहे. शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ कोपरगावकरांपर्यंत पोहोचवणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. रखडलेली कामे, अपुऱ्या सुविधा आणि दुर्लक्षित प्रश्नांमुळे जनता त्रस्त असून आता निष्क्रिय राजकारणाला कंटाळली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी काळे यांनी विश्वास व्यक्त केला की, कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळेल.

Leave a Reply

You cannot copy content of this page