नगरपालिकेचा निकाल म्हणजे विधानसभेचा निकाल नाही – काळे
The municipal election result is not the same as the assembly election result – Kale
११ प्लस फाईव्ह’ फार्म्युल्यावर प्रश्न; काळेंकडून ऑफरचा इन्कार
हा धनशक्ती दहशतीचा विजय कोयटेंचा पराभव स्वीकारत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनTue23 Dec 8.50Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगाव नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांचा अवघ्या ४०९ मतांनी पराभव झाला असला, तरी शहरातील राजकीय गणित बदललेले नाही, असा ठाम दावा आमदार आशुतोष काळे यांनी केला. निवडणुकीत विजयी ठरलेल्या ११ नगरसेवकांसह पराभूत १९ उमेदवारांना मिळालेल्या जनसमर्थनाबद्दल आभार मानण्यासाठी सोमवारी (२२)दुपारी गौतम बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत काळे यांनी विरोधकांवर टोमणे लगावत पुढील दिशा स्पष्ट केली.
“२०१६ च्या तुलनेत यंदा परिस्थिती नक्कीच चांगली आहे. तेव्हा आमचे सात नगरसेवक होते, आज ११ झाले आहेत. तीन उमेदवार अगदी कमी मतांनी पराभूत झाले. काका कोयटे यांचा फरक केवळ ०.९४ टक्के आहे,” असे सांगत काळे यांनी निकालाचे गणित मांडले. विजयी गटातील १९ पैकी पाच नगरसेवक छत्री व कप-बशी (अपक्ष) चिन्हावर निवडून आल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
सत्ताधाऱ्यांसोबत असलेल्या चार छत्री व एक कपबशी या पाच अपक्षांना तुम्ही उपनगराध्यक्ष समिती सभापती पदाची तुम्हाला संधी असल्याचे सुचवून बिनशर्त पाठिंबा देऊ असे तुम्ही म्हणता “११ प्लस फाईव्ह अपक्ष” हा फार्म्युला ही अपक्षांना अप्रत्यक्ष ऑफर तर नाही ना ?असा थेट प्रश्न आमदार आशुतोष काळे यांना विचारण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना काळे यांनी ऑफरचा आरोप फेटाळत, “आम्ही कोणतीही ऑफर देत नाही. शहराच्या विकासासाठी निर्णयप्रक्रियेत समतोल राहावा, ठराव असो की निर्णय—तो लोकहिताचा असावा, यासाठीच हा फार्म्युला आहे,” असे स्पष्ट केले. असले तरी १६ जणांची मोट बांधण्याची त्यांची मनीषा लपून राहिली नाही.
“शहराचा विकास प्रामाणिक व पारदर्शी असेल तर आम्ही विरोधक असूनही साथ देऊ. कारण न्यायालयात जाऊन कामे अडवणे, लोकांना झुलवत ठेवणे ही आमची संस्कृती नाही,” असा टोला त्यांनी लगावला.विकासासाठी आवश्यक असेल तेथे बिनशर्त पाठिंबा दिला जाईल, मात्र सत्तेचे राजकारण न करता शहरहिताला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. “मागील वेळी अपक्ष नगराध्यक्ष असताना आम्ही विकासासाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता. याची आठवण करून दिली
नगरपालिका निकालाचा थेट संबंध विधानसभेशी जोडू नये, असे सांगताना काळे म्हणाले, “मागील वेळी सात नगरसेवक असूनही मला अडीच हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाली आणि ८२२ मतांनी विजय झाला. प्रत्येक निवडणूक वेगळी असते. मी सांगितले होते मला तिकीट मिळणार तरीही २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा अंदाज पाहून समोरच्यांनी रिव्हर्स गिअर टाकला, हेच सत्य आहे.” पुढील चार वर्षांत लोकांच्या अडचणी सोडवण्यावर भर राहील, असे सांगत आत्मपरीक्षणातून अधिक ताकदीने उभे राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालिका निधीबाबत प्रश्न उपस्थित होताच काळे म्हणाले, “निधी दिला जाईल; पण त्याचा दर्जेदार वापर झाला पाहिजे. रस्ते असोत वा अन्य कामे, आमचे ११ शिलेदार लक्ष ठेवतील,” असा टोमणा त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
दरम्यान, पराभव स्वीकारताना नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. “पराभव हा पराभवच असतो, तो मी स्वीकारतो. पंचवीस वर्षे समाजकारण केल्यानंतर अवघ्या ४० दिवसांत मला १८,०९४ मते मिळाली. राष्ट्रवादीला ४३ टक्के मतदान असताना आम्हाला ५७ टक्के मते मिळाली. सत्ताधाऱ्यांना मिळालेली सर्व मते कमळाची नाहीत; त्यात चार छत्री आणि एक कप-बशी आहे,” असा दावा त्यांनी केला.
ही निवडणूक धनशक्ती व दहशतीच्या जोरावर जिंकली गेल्याचा आरोप करत, “विकासाच्या कामात आम्ही अडथळा आणणार नाही; मात्र चुकीच्या कामाला थारा देणार नाही,” असा इशारा कोयटे यांनी दिला. समता पतसंस्थेवर झालेल्या आरोपांवर बोलताना त्यांनी ठेवीदारांचा आपल्यावर अटल विश्वास असून, ५५ लाखांपर्यंत अवैध सुरक्षा कवच असल्याचे स्पष्ट केले. “आज काळे परिवार माझ्या पाठीशी भक्कम उभा आहे. धनशक्तीचा विजय असला तरी पुढे जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव, शहर प्रमुख सुनील गंगुले, मंदार पहाडे, विरेन बोरावके, धरमशेठ बागरेचा, नवाज कुरेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नगरपालिका निकालानंतर कोपरगावच्या राजकारणात आरोप–प्रत्यारोपांची धार वाढली असून, विकास की संघर्ष यावरच पुढील वाटचाल ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Post Views:
20





