कोपरगाव खड्डेमुक्त–पाणीयुक्त करण्याचा निर्धार! नगराध्यक्ष पराग संधान यांचा थेट कृती अजेंडा;
A resolve to make Kopargaon pothole-free and ensure adequate water supply! Mayor Parag Sandhan’s direct action agenda;
व्यापाऱ्यांच्या नवसपूर्तीतून विकासाचा संकल्प
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSat27 Dec 15.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : शहराच्या रखडलेल्या प्रश्नांवर थेट बोट ठेवत नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्वच्छता ठेकेदाराचा ठेका रिन्यू करणे, स्वतंत्र यंत्रणा उभी करणे, बंद असलेले जलशुद्धीकरण केंद्र तातडीने सुरू करणे, शहर खड्डेमुक्त करणे, पाच नंबर तलावाची पाहणी, फवारणी मोहीम सुरू करणे व ओपन स्पेसचा विकास या कामांना प्राधान्य देणार असल्याचे ठामपणे जाहीर केले. जनतेने दिलेल्या विश्वासाला न्याय देत “विश्वास नामातील प्रत्येक काम पूर्ण करू” असा शब्द त्यांनी दिला.
शनिवारी सकाळी १२ वाजता इंदिरा शॉपिंग सेंटर येथील व्यापाऱ्यांनी पराग संधान नगराध्यक्ष म्हणून निवडून यावेत, या नवसपूर्तीसाठी लाडू वाटप केले. या कार्यक्रमात नगराध्यक्ष संधान बोलत होते. अध्यक्षस्थानी बांधकाम उद्योजक माधवराव देशमुख होते.
नगराध्यक्ष पराग संधान पुढे बोलताना म्हणाले की, शहरात स्वच्छता मोहीम वेगाने सुरू असून अनेक प्रभागांत रस्त्यांवर उभ्या असलेल्या खासगी गाड्या तसेच बांधकामाचा रोडा मोठा अडथळा ठरत आहे. संबंधितांनी तात्काळ आपली वाहने हटवावीत व टाकलेला रोडा स्वतः उचलून घ्यावा, अन्यथा पालिकेमार्फत तो हटवून त्याचा संपूर्ण खर्च संबंधित मालकांकडून वसूल केला जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. “शहर स्वच्छ व शिस्तबद्ध करायचे असेल तर काही वेळा कठोर निर्णय घ्यावेच लागतात; चांगल्यासाठी थोडा वाईटपणा घ्यावा लागतो,” असे ठामपणे त्यांनी सांगितले.

यावेळी कैलास शेठ ठोळे यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराला संधी असल्याचे नमूद करत १४ नवीन रेल्वे थांबे, मालधक्का वाढ, तसेच MIDC उभारणीसाठी जनतेच्या रेट्याची गरज अधोरेखित केली.
नितीन दादा कोल्हे यांनी पाणी योजना तातडीने सुरू करून नागरिकांना शुद्ध पाणी देण्याची ठाम मागणी केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना माधवराव देशमुख म्हणाले, “आज नवसपूर्तीचा दिवस आहे; मागण्यांचा बोजा टाकणार नाही. मात्र दिवसाआड पाणी देणे शक्य आहे. शहरातील आजारांचे मूळ पाणी व धूळ आहेत. मशिनरी घ्या, धूळ साफ करा—मदत लागली तर आम्ही उभे राहू. जनतेने दिलेल्या यशाचे सोनं करा.”
कार्यक्रमास नितीन दादा कोल्हे, मनोज अग्रवाल, नारायण शेठ अग्रवाल, वैभव आढाव, माधवराव देशमुख, नगरसेवक योगेश बागुल, रवींद्र कथले यांच्यासह व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार डागा यांनी मानले.
Post Views:
65





