कबड्डीचा महासंग्राम! महाराष्ट्राची उपांत्य फेरीत झेप; हरियाणा, राजस्थानही शर्यतीत

कबड्डीचा महासंग्राम! महाराष्ट्राची उपांत्य फेरीत झेप; हरियाणा, राजस्थानही शर्यतीत

The grand battle of Kabaddi! Maharashtra advances to the semi-finals; Haryana and Rajasthan are also in the race.

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSat27 Dec 17.00Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव  : शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी झुंजार खेळाचे दर्शन घडवत उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश केला. उपांत्यपूर्व सामन्यात बिहारचा २४ गुणांनी पराभव करत महाराष्ट्राने सुवर्णपदकाच्या दिशेने आपले पाऊल अधिक भक्कम केले. हरियाणा व राजस्थान संघांनीही प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखत उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे स्पर्धेचा थरार आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य (पुणे) व शालेय भारतीय खेल महासंघाच्या संयुक्त विद्यमाने, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मैदान अक्षरशः रणांगण बनले होते.

दुसऱ्या मध्यंतरात महाराष्ट्राचा स्फोट

महाराष्ट्र विरुद्ध बिहार या सामन्यात पहिल्या मध्यंतरात बिहारने १५–१३ अशी आघाडी घेत महाराष्ट्राला अडचणीत टाकले होते. मात्र दुसऱ्या मध्यंतरात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेळाची गती बदलली. आक्रमक चढाया, अचूक बोनस व लोखंडी पकडींच्या जोरावर महाराष्ट्राने २९–३ अशा फरकाने सामना फिरवत दणदणीत विजय मिळविला.

सई शिंदे व आरती खांडेकर यांनी अष्टपैलू खेळ करत सामना गाजवला. त्यांच्या खेळाला प्रेक्षकांनी उभे राहून दाद दिली. बिहारकडून छाया, छोटी व शिवानी उमाटी, तसेच दिलखुश हिने झुंज दिली; मात्र महाराष्ट्राचा वेग रोखता आला नाही.

हरियाणाची ताकद, आसामचा सपशेल पराभव, 

हरियाणा विरुद्ध आसाम सामन्यात हरियाणाने सुरुवातीपासूनच पकड मजबूत ठेवली. पहिल्या मध्यंतरात २६–९ अशी भक्कम आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या मध्यंतरातही वर्चस्व कायम ठेवत ३९ गुणांनी सामना जिंकला. मुस्कान, कोमल व मनीषा यांच्या पकडी निर्णायक ठरल्या.

शेवटच्या क्षणापर्यंत थरार

स्पर्धेतील इतर लढतींमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळाली.

पंजाबने दिल्लीवर ३७–३५ असा निसटता विजय मिळविला.

राजस्थानने सीबीएससीवर अवघ्या एका गुणाने (४३–४२) बाजी मारली.

महाराष्ट्राने पश्चिम बंगालवर ४२–२४ असा एकतर्फी विजय मिळविला.

उत्तर प्रदेशने मध्य प्रदेशवर ३७–२७ असा विजय नोंदविला.

हरियाणाने केरळवर ३१ गुणांनी वर्चस्व सिद्ध केले.

गोल्डन रेडचा थरार

बिहार विरुद्ध कर्नाटक सामना ३७–३७ असा बरोबरीत सुटल्यानंतर गोल्डन रेडवर गेला. निर्णायक क्षणी बिहारने एक गुण मिळवत सामना आपल्या नावावर केला. राणी, प्राची व दृष्टी उम्री यांचा खेळ लक्षवेधी ठरला.

संघभावनेतून यशस्वी आयोजन

या राष्ट्रीय स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व क्रीडा व्यवस्थापक सुधाकर मलिक यांच्यासह सर्व विभाग, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक व क्रीडा शिक्षकांनी मोठी मेहनत घेतली.

Leave a Reply

You cannot copy content of this page