गौतम पब्लिक स्कूलचा तालुकास्तरीय प्रदर्शनात दुहेरी ठसा
Gautam Public School makes a double impact at the taluka-level exhibition.
चित्रकलेत प्रथम, विज्ञान–गणितात द्वितीय क्रमांकाची दमदार कामगिरी
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSat27 Dec 17.20Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव पंचायत समिती व कोपरगाव तालुका विज्ञान–गणित संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय गणित, विज्ञान व चित्रकला प्रदर्शन दि. २२ ते २४ डिसेंबर दरम्यान के. जे. सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव येथे उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलने चित्रकला प्रदर्शनात प्रथम, तर विज्ञान–गणित प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावून शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला, अशी माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली.
चित्रकला प्रदर्शनात विद्यार्थ्यां आदर्श मोरे याने सादर केलेल्या “सोशल मीडियाचा अतिवापर व त्याचे दुष्परिणाम” या सामाजिक संदेश देणाऱ्या चित्राला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला. तर विज्ञान–गणित प्रदर्शनात समर्थ कुशारे याने सादर केलेल्या “एक्सीडेंटल प्रिव्हेन्शन लिफ्ट” या समाजोपयोगी उपकरणाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. हेच उपकरण जानेवारी २०२६ मध्ये नागेश्वर विद्यालय, जामखेड येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय प्रदर्शनात सादर करण्यात येणार असल्याचेही प्राचार्य शेख यांनी सांगितले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण शिक्षण समिती सदस्य राजेश परजणे, गट शिक्षणाधिकारी शबाना शेख तसेच कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकराव रोहमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी तालुक्यातील शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौतम पब्लिक स्कूलकडून एकूण तीन विज्ञान–गणित उपकरणे सादर करण्यात आली. १ ते ५ वी गटात आर्यन इनामदार याने मॅथेमॅटिकल पार्क (गणितीय उद्यान) सादर करून खेळातून गणित शिकण्याची संकल्पना प्रभावीपणे मांडली. ६ ते ८ वी गटात शेख मोईन याने पर्यावरणपूरक पॅराबोलिक सोलर कुकर सादर केला. ९ ते १२ वी गटात समर्थ कुशारे याच्या अपघात नियंत्रण लिफ्ट या उपकरणाची परीक्षकांनी विशेष दखल घेतली.
चित्रकला स्पर्धेत आदर्श मोरे, गौरव सोनवणे, अथर्व उगले, प्रत्यूष गारे, मुजम्मील पठाण व ओमकार वाघ यांनी सहभाग घेतला. त्यांना कला शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. विज्ञान–गणित विभागातील विद्यार्थ्यांना ज्योती शेलार, राजेंद्र आढाव, प्रतिभा बोरणार, गीतांजली खेमनार, सबिया शेख तसेच सर्व गणित–विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. आ. अशोकराव काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे, व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ. चैताली काळे तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त व सदस्य यांनी सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
Post Views:
26





