हरियाणाला सुवर्ण, तर महाराष्ट्राला रजतवर समाधान!
Haryana won the gold medal, while Maharashtra had to settle for silver!
१७ वर्षांखालील राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेत हरियाणा अजिंक्य; राजस्थानला कांस्य
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSun28 Dec 19.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : ६९ व्या शालेय राष्ट्रीय १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचा थरारक समारोप आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात झाला. देशातील सर्वोत्तम संघांमध्ये झालेल्या या चुरशीच्या स्पर्धेत हरियाणा संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात कडवी झुंज देत महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद मिळवत रजत पदकावर आपले नाव कोरले, तर राजस्थान संघाने तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदकाची कमाई केली.
अंतिम सामना हरियाणा व महाराष्ट्र यांच्यात रंगला. पहिल्या सत्रात महाराष्ट्राने १२, तर हरियाणाने १५ गुणांची कमाई केली. दुसऱ्या सत्रातही हरियाणाने आक्रमक खेळ कायम राखत १५ गुण मिळवले, तर महाराष्ट्राने ११ गुण नोंदवले. अखेर हरियाणाने ७ गुणांच्या फरकाने विजय मिळवत स्पर्धेवर मोहोर उमटवली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील ३३ संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे, कर्नल संदीप खुराना यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, शालेय व क्रीडा व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे यांच्यासह क्रीडा विभागाचे अधिकारी, पंच, संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक उपस्थित होते.
पारितोषिक वितरणावेळी सुष्मिता विखे यांनी खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, त्वरित निर्णयक्षमता, प्रेरणा आणि सांघिक कार्य हे गुण खेळातून विकसित होतात. अंतिम सामन्यात हे गुण ठळकपणे दिसून आले.उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे अभिनंदन केले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपटू म्हणून हरियाणाच्या मनिषा सुखविंदर सिंग हिने, तर उत्कृष्ट बचावपटू म्हणून राजस्थानच्या आयना चौधरी हिने पारितोषिक पटकावले. महाराष्ट्राच्या आरती खांडेकर हिला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
या राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंनी शिस्तबद्ध, कौशल्यपूर्ण व चुरशीचा खेळ सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आणि आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post Views:
24








