नायलॉन मांजाचा फास; संक्रांतीच्या आनंदावर रक्ताचे डाग नको- नगराध्यक्ष पराग संधान यांचे आवाहन
The deadly trap of nylon kite string; let’s not stain the joy of Makar Sankranti with blood – Appeal by Mayor Parag Sandhan.
प्रशासनाला कार्यवाहीचा कडक शब्दांत इशारा
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनTue30 Dec 12.10Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव:संक्रांतीचा सण आनंद, उत्साह आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देतो; मात्र नायलॉन मांजामुळे हा सण जीवघेणा ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. नायलॉन मांजा केवळ बेकायदेशीरच नाही, तर मानवी जीवन, पशुपक्षी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्याचा घणाघाती आरोप कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी केला आहे.
दरवर्षी नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले आणि निष्पाप पक्ष्यांचे बळी जात असल्याचे भयावह वास्तव त्यांनी मांडले. गळे चिरले जाण्याच्या, गंभीर जखमा होण्याच्या आणि काही प्रकरणांत नागरिकांना जीव गमवावा लागण्याच्या घटना समाजासाठी धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“संक्रांतीच्या नावाखाली मृत्यूचा खेळ थांबायलाच हवा,” असा थेट इशारा देत नगराध्यक्ष संधान यांनी नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व वापर यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून नायलॉन मांजा बाजारातून हद्दपार करावा, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
नागरिकांनाही त्यांनी कडक शब्दांत आवाहन केले आहे. “आपल्या हातातील दोऱ्यामुळे कुणाचा जीव धोक्यात येऊ नये, याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आनंद साजरा करताना सामाजिक भान विसरू नका. पर्यावरणपूरक, सुरक्षित व कायदेशीर दोराच वापरा,” असे त्यांनी स्पष्ट केले.
संक्रांती हा आनंदाचा सण आहे, अश्रूंचा नाही! त्यामुळे नायलॉन मांजासारख्या जीवघेण्या प्रकारांना पूर्णविराम देत सुरक्षित व पर्यावरणस्नेही पद्धतीनेच सण साजरा करूया, असे जोरदार आवाहन नगराध्यक्ष पराग संधान यांनी केले आहे.
Post Views:
20