कोपरगाव प्रभाग ३ मध्ये नववर्षाची सुरुवात सन्मान व भक्तीने!
The new year begins with respect and devotion in Kopargaon Ward 3!
कोपरगावात १ जानेवारीला नागरी सत्कार व भजन संध्या
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed31 Dec 8.20Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : नववर्ष २०२६ ची पहिली पहाट सन्मान, सेवा आणि भक्तीच्या भावनेतून उजळावी, या उद्देशाने साई समर्थ प्रतिष्ठान, कोपरगाव यांच्या वतीने गुरुवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान तसेच नगरसेवक उमेदवारांचा नागरी सत्कार व भजन संध्येचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आयोजित हा कार्यक्रम निवारा येथील सप्तशृंगी माता मंदिर परिसर, डेली फ्रेश रोड येथे सायंकाळी ठीक ६ वाजता सुरू होणार आहे. या कार्यक्रमास युवानेते विवेक कोल्हे व सौ. रेणुका कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात नागरी सत्कार समारंभाने होणार असून, लोकशाही प्रक्रियेतून जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा तसेच लोकसेवेच्या भावनेतून निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर भक्तिरसाने ओथंबलेली भजन संध्या आयोजित करण्यात आली असून, ‘गौरव महाराष्ट्राचा’ विजेते भजन गायक राहुल खरे आपल्या सादरीकरणातून उपस्थितांना भक्तिमय वातावरणात चिंब भिजवणार आहेत.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी समाजात सकारात्मक ऊर्जा, एकता, सलोखा आणि अध्यात्मिक प्रेरणा निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. हा कार्यक्रम साई समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक कलविंदर सिंग दडीयाल, पराग संधान मित्रपरिवार तसेच प्रभाग क्रमांक तीन मधील सर्व नागरिकांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास निवारा, कोजागिरी, जानकी विश्व, रिद्धी-सिद्धी, सुभद्रा नगर, येवला रोड, आढाव वस्ती, विद्यानगर, रचना पार्क परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभणार आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सन्मान आणि भक्तीची अनुभूती देणाऱ्या या कार्यक्रमास कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साई समर्थ प्रतिष्ठान, कोपरगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views:
11