उस वाहतुकीत ‘जुगाड’ नकोच! सुरक्षिततेलाच प्राधान्य द्या— निरंजनसिंग परदेशी 

उस वाहतुकीत ‘जुगाड’ नकोच! सुरक्षिततेलाच प्राधान्य द्या— निरंजनसिंग परदेशी 

No makeshift arrangements should be used in sugarcane transportation! Prioritize safety— Niranjan Singh Pardeshi

कोल्हे कारखाना येथे एक दिवशीय सुरक्षा शिबिर

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed31 Dec 8.30Am.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :कारखानदार, उस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाना यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या उस वाहतूकदार चालकांनी सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. जुगाड पद्धतीने होणाऱ्या उस वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून, रस्ते सुरक्षेच्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट प्रतिपादन श्रीरामपूर कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक निरंजनसिंग परदेशी यांनी केले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉली व जुगाड वाहन चालक-मालकांसाठी आयोजित एकदिवसीय सुरक्षा शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य शेतकी अधिकारी एन. डी. चौधरी होते.

प्रास्ताविकात उपमुख्य शेतकी अधिकारी सी. एन. वल्टे यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, कार्यकारी संचालक सुहास यादव व साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे हे उस वाहतूकदारांच्या वैयक्तिक सुरक्षेबरोबरच मोफत आरोग्य तपासणीचीही काळजी घेत असल्याचे सांगितले. कारखान्याचे सुरक्षा अधिकारी रमेश डांगे यांनी वाहनधारकांना कापडी रिफ्लेक्टर कारखाना यंत्रणेमार्फत देण्यात आल्याची माहिती दिली.

परदेशी पुढे म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्याच्या उस वाहतुकीचे नियोजनबद्ध परीक्षण करून वाहन विभागातील अधिकाऱ्यांना  आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. उसाची ने-आण करताना क्षमतेपेक्षा जादा वाहतूक करू नये, कर्णकर्कश गाणी वाजवू नयेत, बैलगाडीच्या दर्शनी भागावर तसेच ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉली व जुगाडच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर अनिवार्य लावावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रॅक्टर-जुगाडमधून होणाऱ्या उस वाहतुकीत अपघातांचे प्रमाण अधिक असल्याने १ जानेवारीपासून कडक नियमांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. सुरक्षिततेलाच प्राधान्य देत सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अनिल दुर्गे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केनयार्ड सुपरवायझर दिपक जगताप व दशरथ भवर यांनी केले. आभार रमेश डांगे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page