युरिया टंचाईने रब्बी हंगाम धोक्यात; तातडीने खतपुरवठा करा -आ. आशुतोष काळे

युरिया टंचाईने रब्बी हंगाम धोक्यात; तातडीने खतपुरवठा करा -आ. आशुतोष काळे

Rabi season at risk due to urea shortage; supply fertilizers immediately – MLA Ashutosh Kale

कोपरगाव जिल्हा कृषी प्रशासनाला कडक निर्देश

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed31 Dec 8.40Am.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :चालू वर्षी समाधानकारक पावसामुळे कोपरगाव तालुक्यात रब्बी हंगामातील पिके जोमदार अवस्थेत असली तरी युरिया खताच्या तीव्र तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ऐन रब्बी हंगामात आवश्यक खत वेळेवर मिळत नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून, या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यात तातडीने युरियाचा पुरवठा सुरळीत करा, अशा स्पष्ट सूचना आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना पाठविलेल्या पत्राद्वारे दिल्या आहेत.

पत्रात आ. काळे यांनी नमूद केले आहे की, रब्बी हंगाम सुरू असतानाच तालुक्यातील सेवा सहकारी संस्था व कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खताचा साठा अपुरा असून अनेक ठिकाणी शिल्लकच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यावर्षी वातावरण रब्बी पिकांसाठी अतिशय पोषक असून ऊस, गहू, मका, कांदा यांसारखी पिके चांगल्या अवस्थेत असतानाही युरिया खत वेळेवर न मिळाल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

युरिया अभावी पिकांची वाढ खुंटल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. बदलत्या हवामानाशी झुंज देत शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे आ. काळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तालुकानिहाय युरियाच्या मागणीचा तातडीने आढावा घ्यावा व आवश्यकतेनुसार अतिरिक्त साठा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी कृषी विभागाने विशेष दक्षता घ्यावी व संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कोपरगाव तालुक्यात नियमित व पुरेसा युरिया खत पुरवठा तातडीने सुरू करावा, असे निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दिले आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page