कर्मवीर विद्यालयात क्रीडागुणांना उधाण; क्रीडा महोत्सव उत्साहात
Sports talent flourishes at Karmveer Vidyalaya; the sports festival was celebrated with great enthusiasm.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत हाच उद्देश
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed31 Dec 9.10Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करत, कोपरगाव शहरातील साई कॉर्नर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयात आंतरशालेय क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिक्षणासोबतच क्रीडेमधून शारीरिक क्षमता, मानसिक ताकद, शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित व्हावेत या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या महोत्सवाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून क्रीडा महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी आकर्षक स्मोक फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर उत्साहाने भारावून गेला.
या क्रीडा महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या माजी शिक्षिका श्रीमती गुजराती ताई, स्कूल कमिटी सदस्य प्रकाश रुईकर, अंबादास वडांगळे, रमेश गवळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी के. बी. पी. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ लव्हाटे विराजमान होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडेमधील सातत्य, जिद्द व शिस्त यांचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले.
स्पर्धांमध्ये धावणे, लिंबू-चमचा, पोटॅटो शर्यत, लंगडी, संगीत खुर्ची यांसह विविध मैदानी खेळांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जिद्द, चिकाटी आणि खेळाडूवृत्तीचे प्रभावी दर्शन घडवले. विजय-पराजय समत्वाने स्वीकारण्याची वृत्ती या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये विकसित होताना दिसून आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख श्रीमती मंजुषा कुमावत यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती प्राजक्ता राणे यांनी मानले.
या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक शिवाजीराव लंके, क्रीडा विभाग प्रमुख श्रीमती मंजुषा कुमावत, सहशिक्षिका उर्मिला घुले, कावेरी वलटे, प्राजक्ता राणे, मीना पावले, माया बनकर यांच्यासह क्रीडाशिक्षक, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण क्रीडा महोत्सव आनंदी, उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
Post Views:
10







