कोपरगाव वळणावर : सरतं वर्ष अपुऱ्या उत्तरांचं, नवं वर्ष ठोस निर्णयांचं

कोपरगाव वळणावर : सरतं वर्ष अपुऱ्या उत्तरांचं, नवं वर्ष ठोस निर्णयांचं

At the Kopargaon turn: The year ending is one of incomplete answers, the new year will be one of concrete decisions.

शहर वाढतंय, प्रश्नही वाढतायत; घोषणा संपून अंमलबजावणीची वेळ

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed31 Dec 20.10Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: शिक्षणसंस्थांची प्रतिमा, शेतकऱ्यांची कोंडी, नागरी सुविधांचा तुटवडा आणि राजकीय ध्रुवीकरण—२०२५ ने उघडी ठेवलेली आव्हानं २०२६ कडे ढकलली, सरतं वर्ष कोपरगावसाठी आत्मपरीक्षणाचं ठरलं. शहर विस्तारत असताना मूलभूत नागरी प्रश्न मात्र तिथेच अडकले. पाणी, रस्ते, वाहतूक आणि स्वच्छतेवर चर्चा झाली; प्रत्यक्ष कृती मात्र अपुरी राहिली.

शिक्षण हे कोपरगावचं बलस्थान. नामांकित संस्था, महाविद्यालयं आणि व्यावसायिक शिक्षणामुळे शहराची ओळख मजबूत आहे. तरी गुणवत्तेबरोबर रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचा वेग वाढला का, हा प्रश्न कायम आहे. विद्यार्थी घडवले जात आहेत; पण त्यांना इथंच संधी मिळतेय का?

शेतीच्या बाबतीत वर्ष निराशाजनक ठरलं. पाणीटंचाई, खर्चवाढ आणि बाजारातील अनिश्चितता यामध्ये शेतकरी सापडला. अनुदान, योजना जाहीर झाल्या; लाभ मात्र वेळेवर पोहोचला नाही. शेतीपूरक उद्योग आणि प्रक्रिया केंद्रांवर अजूनही ठोस निर्णय नाहीत.

सामाजिक पातळीवर शहर शांत दिसतं, पण आतून अस्वस्थ आहे. वाढती महागाई, युवकांमधील दिशाहीनता आणि सोशल मीडियावरचं राजकारण हे प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत.

राजकारणात वर्षभर आरोप–प्रत्यारोप सुरू राहिले. विकास आराखड्यांपेक्षा निवडणूक गणितं पुढे राहिली. लोकांना नेतृत्वाकडून अपेक्षा आहेत.फक्त भाषण नव्हे, तर ठोस काम.

सरत्या वर्षात कोपरगाव तालुक्यातील बँका व पतसंस्थांसमोर मिश्र आर्थिक वास्तव उभे राहिले. एकीकडे शेतकी, साखर उद्योग व किरकोळ व्यापारावर अवलंबून असलेली स्थानिक अर्थव्यवस्था महागाई, वाढते व्याजदर व अनिश्चित बाजारपेठेमुळे दबावात राहिली. पावसाचे अस्मानी संकट, अतिवृष्टी-दुष्काळाची चक्रे यामुळे शेती उत्पन्नात चढउतार दिसून आले; त्याचा थेट परिणाम कर्जफेडीवर झाला. तरीही सहकारी बँका व पतसंस्थांनी पुनर्रचना, कर्जवाढ व शिस्तबद्ध वसुलीवर भर देत तग धरला. डिजिटल व्यवहारांची वाढ व शासकीय योजनांची मदत यामुळे आर्थिक व्यवहारांना काही प्रमाणात स्थैर्य लाभले.

नवं वर्ष कोपरगावकडून एकच मागणी करतंय,दृष्टीकोन बदलण्याची. योजना कागदावर न राहता रस्त्यावर दिसायला हव्यात. अन्यथा वर्ष बदललं तरी प्रश्न मात्र तसेच राहतील.

Leave a Reply

You cannot copy content of this page