तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून घडेल उद्याचा डॉ. कलाम – राजेश परजणे
Tomorrow’s Dr. Kalam will emerge from the taluka-level science exhibition – Rajesh Parjane
शिक्षक–विद्यार्थी समाजाचे देणे लागतो;
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed31 Dec 9.00Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव, : “शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याने आपण समाजाचे देणे लागतो. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासारख्या मोठ्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रमातून हे सामाजिक दायित्व पूर्ण होते. अशा उपक्रमांना शाळा, महाविद्यालयांसोबतच समाजानेही प्रोत्साहन व पाठबळ द्यावे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य दूध संघाचे माजी चेअरमन मा. राजेश परजणे यांनी केले.
पंचायत समिती कोपरगाव, विज्ञान–गणित–कला अध्यापक संघ तसेच के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ व्या कोपरगाव तालुका विज्ञान, गणित, कला व पर्यावरण प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, विश्वस्त संदीप रोहमारे, सत्येन मुंदडा, प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
परजणे पुढे म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना के. जे. सोमैया सारखे सुसज्ज व दर्जेदार महाविद्यालय पाहण्याची संधी या प्रदर्शनामुळे मिळाली.अशा बालवैज्ञानिकांमधूनच उद्याचे डॉ. अब्दुल कलाम घडतील, असा ठाम विश्वास वाटतो,” असे सांगत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.
प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी मा. शबाना शेख यांनी तालुक्यातील तब्बल २५० शाळांमधून ३५० विज्ञान उपकरणांची मांडणी करण्यात आल्याची माहिती दिली. प्लास्टिक निर्मूलन, कचरा व्यवस्थापन, ए.आय. तंत्रज्ञान यांसारख्या विषयांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगून, अल्प कालावधीत भव्य आयोजन केल्याबद्दल सोमैया महाविद्यालयाचे आभार मानले.
महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करताना प्राचार्य डॉ. विजय ठाणगे म्हणाले, “या प्रदर्शनातील उपकरणांमधून विद्यार्थ्यांची मेहनत, जिद्द आणि कल्पकता स्पष्ट दिसून येते. त्यामुळे उद्याच्या भारताचे भविष्य निश्चितच उज्वल आहे.”
उद्घाटन समारंभाची सुरुवात के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या स्वागतगीत, विज्ञानगीत व महाराष्ट्र गीताने झाली. यावेळी तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपकरण तयार करणाऱ्या गोधेगाव शाळेच्या बालवैज्ञानिक कार्तिक कैलास साळुंके व त्यांचे मार्गदर्शक श्री. कुंदे सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन गोरखनाथ चव्हाण यांनी तर आभारप्रदर्शन योगेश सावळा यांनी केले. या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य बाळासाहेब सोनवणे, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे यांच्यासह सर्व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले.
Post Views:
10





