सत्तेच्या दबावाखाली पत्रकारिता; सत्य मांडण्याची हिंमत कमी होत चालली — डॉ. विजय चोरमारे

सत्तेच्या दबावाखाली पत्रकारिता; सत्य मांडण्याची हिंमत कमी होत चालली — डॉ. विजय चोरमारे

Journalism under the pressure of power; the courage to present the truth is diminishing — Dr. Vijay Chormare

बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त पत्रकार दिनी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना स्थळी रोखठोक भाष्य

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSun4 Jan 20.20Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव:बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना स्थळी आयोजित पत्रकार सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक डॉ. विजय चोरमारे बोलत होते. यावेळी त्यांनी आजच्या पत्रकारितेची स्थिती, सहकार क्षेत्राची प्रतिमा आणि माध्यमांवरील सत्तेचा वाढता प्रभाव यावर परखड शब्दांत भाष्य केले.

आज पत्रकारितेसाठी तांत्रिक सुविधा वाढल्या असल्या तरी सत्य निर्भयपणे मांडण्याची मोकळीक कमी होत चालल्याची खंत डॉ. चोरमारे यांनी व्यक्त केली. प्रतिकूल परिस्थितीत २१ वर्षांचा तरुण स्वतंत्रपणे वृत्तपत्र काढतो, ही घटना पत्रकारितेच्या मूळ मूल्यांची आठवण करून देणारी असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकार क्षेत्राबाबत शहरी माध्यमांनी ‘भ्रष्टाचार’ असा एकांगी नकारात्मक नरेटिव्ह तयार केला असून, साखर कारखानदारीने ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थकारण आणि जीवनमान बदलले, याचे वस्तुनिष्ठ दस्तावेजीकरण झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बातमीपेक्षा जाहिरातींचे महत्त्व ठरवले जात असल्याने पत्रकारितेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

पत्रकारांवरील हल्ले, खोटे गुन्हे आणि कठोर कायद्यांचा गैरवापर वाढत असल्याचे नमूद करत, “सत्तेच्या बाजूने नव्हे तर समाजाच्या बाजूने उभे राहून निर्भय पत्रकारिता केली, तरच खऱ्या अर्थाने पत्रकार दिन साजरा झाला असे म्हणता येईल,” असा रोखठोक संदेश त्यांनी दिला.

दोन पक्षांच्या आघाडीला छेद; राष्ट्रवादीची ताकद वाढली

यावेळी बोलताना अशी आमदार आशुतोष काळे म्हणाले की कोपरगाव नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. २०१६ प्रमाणेच यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण पॅनल लढवला होता आणि विरोधात दोन पक्षांनी एकत्र येत ताकद आजमावली. मात्र, यावेळी राष्ट्रवादीला मिळालेली मते लक्षणीयरीत्या वाढली असून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अवघ्या ४०९ मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले की, ही निवडणूक केवळ राजकीय कार्यकर्त्यांची नव्हे तर मतदारांच्या कसाची ठरली. दिवसेंदिवस प्रचार तीव्र होत गेला, प्रत्येक मतदाराशी वारंवार संवाद साधण्यात आला. प्रभाग क्रमांक तीनमध्ये झालेल्या चुकीमुळे अपेक्षित यश हुकले, अन्यथा चित्र वेगळे असते, असे त्यांनी नमूद केले.

या निकालातून सकारात्मक संकेत मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करतील. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी योग्य नियोजन सुरू असून ठोस निकाल घेण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचेही काळे यांनी स्पष्ट केले.

आ आशुतोष काळे  पुढे म्हणाले की,देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ८० वर्षे पूर्ण होत असताना, स्वातंत्र्योत्तर काळात माध्यमांची भूमिका अधिक प्रभावी ठरली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बातम्या वेगाने लोकांपर्यंत पोहोचत असून त्यामुळे नागरिक अधिक सतर्क व जागरूक होत आहेत. आपल्या परिसरातील अनेक घडामोडी माध्यमांमुळे तत्काळ समोर येतात आणि त्यावर योग्य ती काळजी घेतली जाते. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिकाद बजावत पत्रकार सामाजिक अन्याय, राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण करून शहरापासून ग्रामीण भागापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. या जबाबदार कार्याबद्दल पत्रकारांचे अभिनंदन व शुभेच्छा.

सूत्रसंचालक गोरक्षनाथ चव्हाण
यांनी केले तर शेवटी आभार कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी मानले. पत्रकार मोठ्या संख्येने हजर होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page