पत्रकारिता समाजाचा आरसा; पक्ष-जात यांचे लेबल न लावता सत्य मांडण्याची गरज – कमलेश सुतार
Journalism is the mirror of society; there is a need to present the truth without attaching labels of party or caste – Kamlesh Sutar
पत्रकार दिनानिमित्त माध्यमांच्या बदलत्या भूमिकेवर स्पष्ट भाष्य
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed7 Jan 15.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे साधन नसून समाजाचा आरसा आहे. मात्र आजची पत्रकारिता सामाजिक व राजकीय बदलाचे प्रभावी माध्यम न राहता कुठेतरी आर्थिक गणितांत अडकत चालली आहे, अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ पत्रकार कमलेश सुतार यांनी मांडली.
पत्रकार दिनानिमित्त संजीवनी उद्योग समूह व संजीवनी युनिव्हर्सिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे होते.
प्रारंभी ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर’ व स्व. सहकार मंत्री शंकरराव कोल्हे यांचे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.तर व्यासपीठावर संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, सचिव अंबादास अंत्रे, डिजिटल मीडियाचे प्रशांत जाधव उपस्थित होते.
यावेळी महिला पत्रकारांची अनुपस्थिती असल्याची खंत नमूद करत त्यांनी पत्रकारितेत सर्व घटकांचे प्रतिनिधित्व आवश्यक असल्याचे सांगितले. समाजाचा आरसा म्हणवून घेणाऱ्या माध्यमांनी स्वतःकडेही आत्मपरीक्षणाने पाहिले पाहिजे, असे श्री सुतार म्हणाले.
पूर्वी पत्रकार आणि राजकारणी यांच्यात आवश्यक अंतर व परस्पर सन्मान होता. पत्रकार प्रश्न विचारायचा; वाकून नमस्कार करायचा नाही. मात्र आजच्या राजकारणात तो समतोल ढासळत चालल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
देशात वृत्तपत्रे व न्यूज चॅनेल्सची संख्या वाढली असली तरी पत्रकारितेचे स्वातंत्र्य वाढले आहे का, असा सवाल उपस्थित करत सुतार यांनी आंतरराष्ट्रीय पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकाचा उल्लेख केला. २०१८ साली पाकिस्तान भेटीदरम्यान तेथील पत्रकार ज्या निर्भीडपणे भूमिका मांडतात, त्याचा अनुभव त्यांनी सांगितला.
पत्रकारिता, राजकारण आणि समाज यांचे प्रतिबिंब एकमेकांवर पडत असते. त्यामुळे पत्रकारांनी पक्षाचा किंवा जातीचा पत्रकार न होता समाजाला आरसा दाखविण्याचे काम करावे, असे आवाहन सुतार यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक करताना अमित कोल्हे यांनी आपल्या भाषणातून संजीवनी शैक्षणिक संस्थेच्या उज्ज्वल परंपरेला आणि भविष्यदृष्टीला प्रभावी शब्दांत अधोरेखित केले. स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या विचारधारेतून उभी राहिलेली संजीवनी ही केवळ शिक्षणसंस्था नसून ग्रामीण प्रतिभेला संधी देणारे विश्वासाचे व्यासपीठ आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आधुनिक अभ्यासक्रम, उद्योगाभिमुख शिक्षण, उत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि मजबूत प्लेसमेंट प्रणालीमुळे संजीवनीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने उचललेली प्रत्येक पायरी ही गुणवत्तेची नवी उंची गाठणारी असल्याचे सांगत त्यांनी संजीवनीचा यशस्वी प्रवास म्हणजे शिक्षण क्षेत्रातील आदर्श मॉडेल असल्याची माहिती दिली.
पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार सन्मान कार्यक्रमात विवेक कोल्हे यांनी सध्याच्या पत्रकारितेतील काही चिंताजनक बाबींवर परखडपणे भाष्य केले. विशेषतः फॉरवर्ड पत्रिकांमधून येणाऱ्या बातम्या कोणतीही पडताळणी, संपादन किंवा आशयात्मक विवेक न लावता थेट जशाच्या तशा छापल्या जात असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. बातमीसोबत येणाऱ्या फोटोखालील ओळी देखील तशाच प्रसिद्ध होत असल्याने पत्रकारितेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. सत्य, वस्तुनिष्ठता आणि वैचारिक जबाबदारी ही पत्रकारितेची खरी ओळख असून ती जपण्याची गरज असल्याचे विवेक कोल्हे यांनी ठामपणे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक साहेबराव दवंगे यांनी मानले .
Post Views:
25







