जनतेसमोर जनतेतून शपथ: कोपरगावचा ‘राजकीय प्रयोग’ महाराष्ट्राला दिशा देणारा – प्रा.राम शिंदे

जनतेसमोर जनतेतून शपथ: कोपरगावचा ‘राजकीय प्रयोग’ महाराष्ट्राला दिशा देणारा – प्रा.राम शिंदे

An oath taken before the people, by the people: Kopargaon’s ‘political experiment’ will guide Maharashtra – Prof. Ram Shinde

पक्षश्रेष्ठीच्या आदेशाने विधानसभेला विवेक कोल्हे यांनी थांबण्याचा घेतलेला निर्णय; हा समजूतदारपणा कोठून आणला !

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनMon5 Jan 20.30Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :राजकारणात निवडणूक जिंकून ‘सत्कारांची रांग’ लावण्याची परंपरा असताना, कोपरगावने सोमवारी (५ जानेवारी) संध्याकाळी एक वेगळाच लोकशाही अध्याय लिहिला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जाहीर शपथविधी थेट जनतेसमोर, जनतेतून झाला आणि याच मंचावरून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सत्तेची ताकद, विरोधकांची अस्वस्थता आणि भविष्यातील राजकीय संकेत यांचे धारदार भाष्य केले.

“ज्यांच्या हातात जनतेने सत्ता दिली, त्यांनी त्याच जनतेसमोर शपथ घेणे—हा महाराष्ट्रात अपवादात्मक आणि दिशादर्शक प्रयोग आहे. कुठे झाला असेल, तर तो केवळ कोपरगावात,” असे ठाम मत व्यक्त करत शिंदे यांनी आश्वासनांच्या राजकारणावर सूचक पण बोचरा टोला लगावला. निवडणुकीआधी मोठमोठी आश्वासने आणि नंतर ‘सोयीची शांतता’—या प्रवृत्तीवर त्यांनी बोट ठेवले.

२० तारखेला मतदान, २१ ला निकाल आणि अवघ्या पंधरा दिवसांत ‘निवडून आलेला लोकप्रतिनिधी कसा असावा’ याचा जिवंत नमुना कोपरगावने दिला, असे सांगत त्यांनी थेट तुलना केली. “इतरत्र सत्कार, हारतुरे आणि फोटोसेशन सुरू असते; कोपरगावमध्ये मात्र नगरसेवक थेट नदीत उतरले, कचरा उचलला, स्वच्छता केली. पुढील पाच वर्षे हाच निकष असेल,” असे स्पष्ट करत त्यांनी काम न करणाऱ्यांसाठी अप्रत्यक्ष इशारा दिला.

या पंधरा दिवसांत दाखवलेली कामाची ‘चित्रफीत’ ही फक्त सुरुवात असून, येणाऱ्या १०० दिवसांचा स्पष्ट रोडमॅप नगराध्यक्षांनी जाहीर केल्याचेही शिंदे यांनी अधोरेखित केले. पहिल्याच बैठकीत मुख्याधिकाऱ्यांना ठोस सूचना, स्वच्छता–सुशोभीकरण–नागरिक समस्या यावर कठोर निर्णय आणि अंमलबजावणीची तयारी हा केवळ भाषणबाजीचा नव्हे, तर कार्यक्षमतेचा संकेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

डिजिटल युगाचा संदर्भ देत त्यांनी आणखी एक प्रशासनाला चिमटा घेतला. “घरबसल्या सर्व सेवा मिळतात; पण नगरपालिका काम थेट सांगण्यासाठी व्यवस्था नाही. हे बदलले पाहिजे. यासाठी स्वतंत्र ॲपच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या प्रभागातील तक्रार थेट नगराध्यक्षांपर्यंत पोहोचता येईल,” अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी डिजिटल लोकशाहीचा अजेंड्याचे कौतुक केले .

याच मंचावरून शिंदे यांनी राजकीय वजनही ठामपणे अधोरेखित केले. “विवेकला सहकार्य करण्याइतके माझ्याकडे वजन आहे—हे जनतेला सांगतोय. कुणी आडवं आलं, तिडवं आलं तरी काळजी करू नका,” असा सूचक इशारा देत त्यांनी कोपरगावपासून मुंबई–दिल्लीपर्यंत सत्ता आपल्या बाजूची असल्याचे स्पष्ट केले. “विरोधकही शेवटी आमच्याकडेच मागणी घेऊन येतात,” असे म्हणत त्यांनी नाव न घेता राजकीय कुरघोडी केली.यावेळी विधानसभेला वरिष्ठांच्या शब्दाला मान देत विवेक कोल्हे यांच्यासारख्या युवकांन जो सामंजस्यपणा समजूतदारपणा घेतला तो त्यांनी कुठून आणला याचे मला कौतुक वाटते असेही त्यांनी म्हटले

दरम्यान, नगराध्यक्ष पराग संधान यांनी १९ नगरसेवकांसह विकासनामा राबवण्याची जाहीर शपथ घेतली. तर विवेक कोल्हे यांनी राम शिंदे यांच्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळातील कामांचा दाखला देत,“पालकमंत्री म्हणजे नावापुरते नव्हे, तर खऱ्या अर्थाने पालकत्व निभावणारा नेता असावा,ते शिंदे साहेबांनी करून दाखवले,” असा सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष पण धारदार टोला लगावला.

“तुमच्याकडे एकच खाते नाही; सगळे मंत्री ऐकतात,” असे सांगत त्यांनी शंभर दिवसांच्या आश्वासनांसाठी थेट सहकार्याची मागणी केली. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही शिंदे यांच्याकडे ‘पालकत्व’ स्वीकारण्याची मागणी करत, त्यांच्या अधिकार, शिस्तप्रिय नेतृत्व आणि अभ्यासू भूमिकेमुळे विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक राम शिंदे यांच्या समावेत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा  कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान, रेणुका कोल्हे, मोनिका संधान, राजेंद्र पिपाडा, सचिन तांबे, संजय सातभाई, दीपक वाजे, दत्तोबा जगताप, केशव भवर, दिलीप दारूणकर,  ॲड .जयंत जोशी या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक मान्यवर उपस्थित होते

शपथ घेण्यापूर्वी कार्यक्रमाची सुरुवात “जय जय महाराष्ट्र” या महाराष्ट्र गीतांनी झाली तर शेवट जनगणमन या राष्ट्रगीताने झाली.

 

चौकट 

एकंदर, स्पष्ट बहुमत, अनुभवी नेतृत्व आणि तरुण नगराध्यक्षांची टीम—या त्रिसूत्रीवर कोपरगावचा विकासनकाशा आखला जात असून, हा ‘जनतेसमोरचा शपथविधी’ केवळ सोहळा नसून राजकीय संदेश देणारा इशारा ठरल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page