कोपरगाव ग्रामीण विकासाला ‘ग्रीन सिग्नल’; २३ गावांसाठी ५.१८ कोटींची मंजुरी- आ आशुतोष काळे
Kopargaon rural development gets the ‘green signal’; Rs. 5.18 crore sanctioned for 23 villages – MLA Ashutosh Kale
रस्ते, स्मशानभूमी व सुशोभीकरण कामांना लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed7 Jan 15.10Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाचा विकास वेगाने मार्गी लावण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीकडून ५ कोटी १८ लाख रुपयांच्या विविध विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीमुळे मतदारसंघातील २३ गावांमधील रस्ते, शिवार मार्ग, सी.डी. वर्क तसेच स्मशानभूमी व चौक सुशोभीकरणाची रखडलेली कामे आता प्रत्यक्षात उतरणार आहेत, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
ग्रामीण भागातील दळणवळण, शेतीमाल वाहतूक व नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीकडे विविध विकास प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या प्रस्तावांना मान्यता मिळाल्याने लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांना सुरुवात होणार आहे.
या निधीतून माहेगाव देशमुख, संवत्सर, कोकमठाण, खिर्डी गणेश, खोपडी, जेऊर कुंभारी, जेऊर पाटोदा, टाकळी, तळेगाव मळे, दहीगाव बोलका, धामोरी, नाटेगाव, मढी बु., सांगवी भुसार, माळेगाव थडी, करजी बु., ब्राम्हणगाव, वेळापूर, कोळगाव थडी, हिंगणी, रामपूरवाडी, शिंगवे तसेच राहाता तालुक्यातील जळगाव अशा एकूण २३ गावांतील विकासकामांचा समावेश आहे.
या कामांमुळे ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते, शिवार रस्ते व गावठाणातील वाहतूक सुलभ होणार असून शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांवरही नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे.
“रस्त्यांशिवाय विकास शक्य नाही. चांगले रस्ते हे गावाच्या प्रगतीचे प्रतिक आहेत,” असे ठाम मत व्यक्त करत आ. आशुतोष काळे यांनी सांगितले की, यापूर्वीही मतदारसंघातील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहेत. उर्वरित गरजांसाठीही महायुती शासनाकडून अधिकाधिक निधी आणण्याचे प्रयत्न सुरूच राहतील.
या प्रशासकीय मंजुरीमुळे कोपरगावच्या ग्रामीण विकासाला नवा वेग मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Post Views:
24





