कोपरगाव नगरपालिकेत सत्ताबळाची चाचणी; रणशूर उपनगराध्यक्ष, काले, अजमेरे, रुईकर स्वीकृत सदस्य

कोपरगाव नगरपालिकेत सत्ताबळाची चाचणी; रणशूर उपनगराध्यक्ष, काले, अजमेरे, रुईकर स्वीकृत सदस्य

A test of power in the Kopargaon Municipality; Ranshoor becomes Deputy Mayor, Kale, Ajmere, and Ruikar appointed as nominated members.

स्पष्ट बहुमत असूनही निवडणूक लढवली;  आरोप-प्रत्यारोप, 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनMon12 Jan 15.10Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :कोपरगाव नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष व तीन स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची प्रक्रिया सोमवारी (१२) रोजी सकाळी अकरा वाजता पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करत पहिल्या सभेला सुरुवात झाली.

३० सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात जनस्वराज्य पार्टीकडे १९+१ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ११ सदस्यांचे बळ आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी जनस्वराज्य आघाडीकडून प्रभाग क्रमांक ९ मधून २०५ मतांनी विजयी झालेले जितेंद्र रणशूर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाग १४-अ मधून २१३ मतांनी विजयी झालेले वाल्मीक लहरे रिंगणात उतरले.

प्रारंभी जनस्वराज्य पार्टीचे गटनेते प्रसाद आढाव यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या गौरी मंदार पहाडे यांनी “निवडणूक ही लोकशाही प्रक्रिया आहे,” असे सांगत लढत देण्याचा ठाम पवित्रा घेतला आणि सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या ‘बिनविरोध अपेक्षेला’ ब्रेक लागला.

हात वर करून घेतलेल्या मतदानात जितेंद्र रणशूर यांना १८ सदस्यांची मते व नगराध्यक्षांचे मत मिळून १९ मते, तर वाल्मीक लहरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ११ सदस्यांची मते मिळाली. परिणामी रणशूर हे ८ मतांनी विजयी ठरल्याची घोषणा पिठासीन अधिकारी पराग संधान यांनी केली. जनस्वराज्य पार्टीचे वैभव आढाव मात्र अनुपस्थित होते.

यानंतर दहा टक्के निकषानुसार तीन स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी तीनच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. जनस्वराज्य पार्टीकडून काले अतुल धनालाल व अजमेरे सोनल अमोल, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुईकर प्रकाश फकीरा यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर करण्यात आली.

उपनगराध्यक्ष पदावर तब्बल ४० वर्षांनंतर बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व मिळाल्याने हा निर्णय सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला. जनस्वराज्य पार्टीने दलित समाजाला संधी दिल्याचा उल्लेख करत रणशूर यांनी “ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती; विरोधकांच्या भूमिकेमुळे समाजात चुकीचा संदेश जाईल,” अशी खंत व्यक्त केली.

याला प्रत्युत्तर देतांना गौरी मंदार पहाडे यांनी, “अकरा ते एक या तीन तासांत सत्ताधाऱ्यांनी चर्चा केली असती तर बिनविरोधाचा विचार झाला असता. सभागृहात अचानक घोषणा करून लोकशाही गृहित धरता येत नाही,” असा टोला लगावला.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल शिरसाठ यांनी रणशूर यांच्या आरोपांचे खंडन करत, “२०११ मध्ये त्यांच्या पत्नीला थेट नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती, हे विसर पडल्यासारखे दिसते,” असा राजकीय चिमटा काढला. तर इम्तियाज अत्तार यांनी आभार व्यक्त करण्याची संधी न दिल्याची नाराजी व्यक्त केली.

पहिल्या सभेला संबोधित करताना नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले, “निवडणूक संपली, राजकारण संपले. आता शहर विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे.” मात्र स्पष्ट बहुमत असूनही विरोधकांनी अट्टाहासाने निवडणूक लढविल्याचा उल्लेख करत त्यांनी विरोधकांचे कान टोचले. अखेरीस ‘वंदे मातरम्’ गीताने सभेचा समारोप झाला. निवडणूक कार्यक्रम कामे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कर्मचाऱ्यांनी चोख भूमिका बजावली

नवनिर्वाचित सदस्यांच्या सदस्यांची शहरातून निळा लाल गुलाल उधळीत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.

 चौकट

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  जनस्वराज्य आघाडीच्या वतीने उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,स्वीकृत नगरसेवक अतुल काले व सोनल अजमेरे यांना स्वीकृत सदस्य उमेदवारी देण्यात आली होती तर आमदार आशुतोष काळे यांच्या राष्ट्रवादी  काँग्रेसकडून प्रकाश रुईकर यांना स्वीकृत  सदस्य उमेदवारी देण्यात आली होती

 

Leave a Reply

You cannot copy content of this page