AIच्या जोरावर गावसमृद्धीचा ध्यास घ्या – चैताली काळे

AIच्या जोरावर गावसमृद्धीचा ध्यास घ्या – चैताली काळे

Strive for village prosperity with the power of AI – Chaitali Kale

एनएसएस शिबिरातून कौशल्य, नेतृत्व व माणुसकीचा संस्कार; मढी खु. येथे उत्साहात उद्घाटन

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon12 Jan 18.30Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, नेतृत्व, संघटन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते. केवळ शिक्षणापुरते न थांबता आपल्या ज्ञानाचा उपयोग गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कसा करता येईल, याचा विचार स्वयंसेवकांनी केला पाहिजे. विशेषतः AI-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करत उत्पादन व नफा वाढवण्याचे मार्ग शोधावेत, असा मौलिक सल्ला कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैताली काळे यांनी दिला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. शुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील मढी खु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवार (दि. १२) ते रविवार (दि. १८) या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सौ. चैताली काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले. त्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, समाजाला युवकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची जबाबदारी युवकांचीच आहे. एनएसएस शिबिरातून नवी पिढी घडत असून स्वयंसेवकांनी आपल्या शिक्षणाचा, कलेचा आणि कौशल्याचा समाजासाठी उपयोग कसा होईल, यावर भर द्यावा. स्वतःचेच नव्हे तर कुटुंब, महाविद्यालय, जिल्हा व राज्याचे नाव उज्ज्वल करण्याचा ध्यास घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “माणुसकी धर्माचा अर्थ जाणतो, श्रम निष्ठा हे पवित्र तीर्थ मानतो” या गीताच्या ओळी आत्मसात करून श्रमाचे महत्त्व ओळखावे व माणुसकीचा धर्म जोपासावा. या शिबिरातील चर्चा सत्रांमधून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि प्रेरणेतून ते आपले कर्तृत्व सिद्ध करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी प्रसिद्ध भारुड सम्राट भानुदास बैरागी यांनी आपल्या मनोगतातून भारुडाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट केले. अभंग, गवळणी आणि भारूड ही महाराष्ट्राची संस्कृती असून, युवकांनी आधुनिक पद्धतीने ही परंपरा जोपासावी. भारुडाच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती होत असून सामाजिक बांधिलकी जपली जाते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव आभाळे, सोपानराव आभाळे, सरपंच सुनील भागवत, उपसरपंच बिपीन गवळी, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक प्रदीप कुऱ्हाडे, प्रकाश आभाळे, शंकरराव आभाळे, विलास निंबाळकर, एज्युकेशन सोसायटीचे इन्स्पेक्टर नारायण बारे, ग्रामपंचायत सदस्य अशोक आभाळे, वसंत भागवत, ग्रामसेवक व्ही. डी. सांबारे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ, प्रा. डॉ. पल्लवी मोरे, स्वयंसेवक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विशाल पोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. उमाकांत कदम यांनी केले तर आभार प्रा. भीमराव रोकडे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page