शुभेच्छा पाकिटातून संक्रांतीच्या गोडव्यात राजकारणाची संमिश्र चव !
A mixed taste of politics in the sweetness of Sankranti, delivered through greeting envelopes!
तिळगुळाच्या गोडीआड मतदारांची आठवण; कोपरगावात वार्डागणिक राजकीय घरपोच मार्केटिंग
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed14 Jan 13.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ ही परंपरा यंदा कोपरगावात ‘आम्हालाच लक्षात ठेवा’ या अजेंड्यासह साजरी झाल्याचे चित्र आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने शहरातील काही नगरसेवकांनी थेट नागरिकांच्या दारात तिळगुळाची पाकिटे पोहोचवत, सणाच्या शुभेच्छांमध्ये राजकीय आठवणींची गोड चव मिसळण्याचा प्रयत्न केला.
सकाळपासूनच विविध वॉर्डांमध्ये कार्यकर्त्यांची रेलचेल दिसत होती. गल्लीबोळांत फिरत नगरसेवकांचे नाव, फोटो आणि संपर्क क्रमांक छापलेली तिळगुळाची पाकिटे घराघरांत वाटली गेली. शुभेच्छांच्या आडून ओळख पक्की करण्याचा कार्यक्रमही रंगला. सणाचा आनंद की सणाच्या नावाखाली जनसंपर्क मोहिम, असा प्रश्न मात्र अनेकांच्या मनात निर्माण झाला.
या उपक्रमाकडे नागरिकांनी संमिश्र नजरेने पाहिले. “घरपोच शुभेच्छा मिळाल्या, आपुलकी वाटली,” अशी प्रतिक्रिया काहींनी दिली; तर “तिळगुळाच्या गोडव्यात राजकारणाची संमिश्र चव आली,” अशी कुजबुजही अनेक घरांमध्ये ऐकू आली.
विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुका, पहिली सर्वसाधारण सभा, उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम योगायोग नसून नियोजनबद्ध डावपेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सणासुदीला नागरिकांच्या दारात पोहोचण्याची संधी साधत नगरसेवकांनी ‘आम्ही आहोत, आम्ही दिसतोय’ असा मूक प्रचार केल्याचे बोलले जात आहे. तिळगुळाच्या पाकिटांमधून केवळ शुभेच्छाच नव्हे, तर पुढील राजकारणाची चुणूकही दिसून आल्याचे जाणकारांचे मत आहे.
एकूणच, यंदाची संक्रांती कोपरगावात फक्त गोड बोलांची न राहता, गोड बोलांआड सुरू असलेल्या राजकीय हालचालींची ठळक साक्ष देणारी ठरली आहे. तिळगुळाची पाकिटे गोडी वाढवतानाच, वार्डागणिक राजकीय तापमान वाढवत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
चौकट
नगराध्यक्ष पराग संधान यांच्याकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
मकर संक्रांतीनिमित्त नगराध्यक्ष पराग संधान यांनी कोपरगावकरांना शुभेच्छा दिल्या. पतंग उडवताना नायलॉन मांजा न वापरता पारंपरिक मांजाचाच वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. सुरक्षित, आनंदी आणि अपघातमुक्त पतंगोत्सव साजरा करण्याचे त्यांनी नागरिकांना आवर्जून सांगितले.
Post Views:
20