“ठेकेदारांना तंबी ही निवडणूकपूर्व नौटंकी;” विवेक कोल्हेंचा आशुतोष काळेंवर हल्लाबोल
“Warning the contractors is a pre-election gimmick;” Vivek Kolhe attacks Ashutosh Kale.
भ्रष्टाचाराची भीती वाटताच आमदारांचे उशिरा सुचलेले शहाणपण
रस्ते, पाणी योजना, शाळा… सर्वच कामांत भ्रष्टाचार; भीतीपोटी इशारे देण्याचा कांगावा, जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत आपला गुलाल निश्चित, असा विश्वास व्यक्त केला
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed14 Jan 17.30Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव मतदारसंघात पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या निकृष्ट कामांवरून आमदारांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिलेली तंबी ही “भ्रष्टाचाराची पोल उघड होऊ नये म्हणून केलेली निवडणूकपूर्व नौटंकी” असल्याचा खळबळजनक आरोप युवा नेते विवेक कोल्हे यांनी केला.
कोपरगाव नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी पराग संधान, उपनगराध्यक्षपदी जितेंद्र रणशूर, तर गटनेतेपदी प्रसाद आढाव यांची निवड तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी विवेक कोल्हे यांची नियुक्ती झाल्याबद्दल शिरसगाव, सावळगाव, पढेगाव, कासली, दहेगाव बोलका, गोधेगाव, आपेगाव, तिळवणी व घोयेगाव ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना विवेक कोल्हे यांनी नाव न घेता आमदार आशुतोष काळे यांच्यावर जोरदार रोखठोक आणि राजकीय टोलेबाजी करत घनाघाती आरोपांची तोफ डागली
“माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नका, सहनशीलता संपली आहे,” असे म्हणत आमदारांनी आढावा बैठकीत ठेकेदार व अभियंत्यांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र हे उशिरा सुचलेले शहाणपण असून, प्रत्यक्षात सगळ्याच रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, असा थेट हल्लाबोल विवेक कोल्हे यांनी केला. नगरपालिकेतील भ्रष्टाचार जसा बाहेर आला, तसाच जिल्हा परिषद व पंचायत समितीतील भ्रष्टाचारही उघड होईल, या भीतीनेच आमदारांना घाम फुटला असल्याची खोचक टिप्पणी करत त्यांनी पुन्हा एकदा डिवचले.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले जिल्हा परिषद व पंचायत समिती सन २०१६ पासून विरोधकांच्या ताब्यात असून, त्याच काळात अध्यक्षा देखील त्यांच्याच होत्या. तरीही परिसरात ठोस, लक्षणीय विकास झालेला दिसत नाही, अशी टीका करत “खरी विकासाची दारे उघडायची असतील, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात घेण्याशिवाय पर्याय नाही,” असे स्पष्ट संकेत कोल्हे यांनी दिले.
ग्रामीण, विशेषतः पूर्व भागातील पालखेड डावा कालवा, कोळ नदीवरील साठवण व पाझर तलाव,गोधेगाव स्मशानभूमी, शिरसगाव -सावरगाव-गोधेगाव रस्ते, नांदूर मध्यमेश्वर कालव्यावरील अकरा गावांची पाणी योजना, पालखेड डाव्या कालव्याच्या पोटचाऱ्या, तसेच जिल्हा परिषद शाळांमधील पूर्णवेळ शिक्षकांचा प्रश्न असे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “सत्तेत गेल्याशिवाय या प्रश्नांना वाचा फुटणार नाही,” असा ठाम सूर त्यांनी लावला.
कोपरगाव नगरपालिकेचा विजय हा एकीचा आणि असत्याविरुद्ध सत्याचा विजय असल्याचे सांगत, “नगरपालिका झाकी है, जिल्हा परिषद-पंचायत समिती अभी बाकी है,” असा राजकीय इशारा देत विवेक कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी जोमाने सज्ज होण्याचे आवाहन केले.
Post Views:
35