संक्रांतीचा आनंद ठरला शोकांत; पतंगाच्या बायडिंग तारेने कोपरगावात अर्णवचा दुर्दैवी मृत्यू
The joy of Sankranti turned into a tragedy; Arnav died a tragic death in Kopargaon due to a kite string made of binding wire.
लक्ष्मीनगरमध्ये गच्चीवर पतंग उडवताना हाय-व्होल्टेज वीज वाहिनीचा शॉक; एक गंभीर जखमी, प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष ठरले जीवघेणे
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed14 Jan 17.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :संक्रांतीच्या आनंदावर काळी छाया पडली. कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात गच्चीवर पतंग उडवताना धाग्याऐवजी धोकादायक बायडिंग तार वापरल्याने झालेल्या भीषण अपघातात १५ वर्षीय अर्णव महेश व्यवहारे याचा हाय-व्होल्टेज वीज वाहिनीचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला ऋषिकेश संजय वाघमारे (वय १५) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुण्याहून संक्रांतीसाठी खास कोपरगावला आलेला अर्णव हा आपल्या मामा ओमकार आनंदा काळे यांच्या लक्ष्मीनगर येथील घराच्या गच्चीवर मित्रासोबत पतंग उडवत होता. याच वेळी बायडिंग तार वीज वाहिनीच्या संपर्कात येताच हा दुर्दैवी प्रकार घडला. क्षणार्धात आनंदाचे क्षण शोकात बदलले.
मृत अर्णवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. प्रशासनाकडून वारंवार इशारे व सूचना देण्यात येत असतानाही धोकादायक तार वापरल्यानेच हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पालकांना आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवण्याचे, तसेच पतंग उडवताना नायलॉन मांजा व बायडिंग तार पूर्णतः टाळण्याचे आवाहन केले आहे. संक्रांतीचा सण आनंदाचा असला तरी निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो, याची ही घटना कटू आठवण करून देणारी ठरली आहे.
Post Views:
18





