कुंभमेळ्याचा निधी शिर्डी’नाशिकला; दक्षिणवाहिनी गोदावरीच्या कोपरगावची मात्र उपेक्षाच!
Kumbh Mela funds diverted to Shirdi and Nashik; Kopargaon, situated on the south-flowing Godavari, is completely neglected!
कोपरगावकडे शासनाची पाठ फिरलेली लाखो भाविकांची पंढरी श्रद्धास्थान असतानाही निधीपासून वंचित दुजाभाव का? नागरिकांचा सवाल
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSun18 Jan 14.30Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :नाशिक येथे कुंभमेळा होत असला तरी दक्षिणवाहिनी गोदावरीत स्नान करण्यासाठी दरवर्षी हजारो नव्हे तर लाखो भाविक कोपरगाव येथे दाखल होतात. त्यामुळे कोपरगावचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व नाकारता येत नाही. शिर्डी येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होऊन कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातही जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत कोपरगावकडे मात्र अद्याप निधी पोहोचलेला नाही.
शिर्डीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांपैकी मोठा वर्ग गोदावरी स्नानासाठी कोपरगावला येतो. स्नान पर्वणीच्या प्रत्येक दिवशी कोपरगाव शहर व तालुक्यात देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहतात. “शिर्डीला आलो की गोदावरी स्नानासाठी कोपरगावला येणे ही आमच्यासाठी श्रद्धेची परंपरा आहे. इथे सोयी-सुविधांचा अभाव जाणवतो,” असे मत उत्तर प्रदेशहून आलेल्या भाविक रामशरण मिश्र यांनी व्यक्त केले. तर, “इतक्या मोठ्या संख्येने भाविक येत असताना घाट, रस्ते, स्वच्छतेकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक भाविक माधव पवार यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर कोपरगावकडे जाणून-बुजून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली मिळणाऱ्या निधीतून कोपरगाव गोदाकाठाचा मोठ्या प्रमाणावर कायापालट होऊ शकतो. याबाबत एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “कोपरगावला भाविकांची संख्या मोठी आहे. नगरपालिकेकडून प्रस्ताव सादर झाल्यास शासन पातळीवर त्याचा सकारात्मक विचार होऊ शकतो.”
राजकीय आडवणूक न करता वस्तुस्थिती पाहून न्याय देण्याची भूमिका शासनाने घ्यावी, अशी अपेक्षा आहे. आजी-माजी आमदारांनीही या प्रश्नावर ठोस पाठपुरावा करावा, अशी जोरदार चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे. कुंभमेळा हा केवळ काही शहरांचा नव्हे, तर संपूर्ण गोदाकाठच्या श्रद्धेचा उत्सव आहे; आणि त्यात कोपरगावलाही न्याय मिळायलाच हवा. भले यासाठी आंदोलन उभारलेले उभारावे लागले तरी सर्व पक्षांनी एकत्रित यावे असे आवाहनही श्रद्धाळू भाविक कोपरगावकर करत आहेत.
Post Views:
16





