आ. आशुतोष काळेंच्या आक्रमक भूमिकेचा ठोस परिणाम; रखडलेल्या कामांना वेग
MLA Ashutosh Kale’s aggressive stance yields concrete results; stalled projects gain momentum.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील सडे–सडे फाटा रस्ता अखेर पूर्ण;
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSun18 Jan 18.10Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव:कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेली अनेक रस्त्यांची कामे मुजोर ठेकेदारांमुळे दीर्घकाळ रखडली होती. मात्र आमदार आशुतोष काळे यांनी घेतलेल्या ठाम व आक्रमक भूमिकेमुळे या कामांना अखेर चालना मिळाली असून विकासाचे आशादायक चित्र दिसू लागले आहे.
कोपरगाव तालुक्यातील सडे गाव ते सडे फाटा या सुमारे एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे निकृष्ट व खराब झालेले काम पुन्हा डांबरीकरण करून पूर्ण करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण पसरले आहे.
ग्रामीण विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या रस्त्यांमुळे दळणवळण सुलभ होत असून शिक्षण, आरोग्य सेवा, शेतीमालाची वाहतूक आणि दैनंदिन जीवनाला मोठी मदत होते. या उद्देशाने आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.
मात्र निधी उपलब्ध असूनही अनेक रस्त्यांची कामे मुदत संपूनही सुरू झाली नव्हती, तर काही कामे अर्धवट अवस्थेत होती. या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी मंगळवार (दि. १३) रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदारांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी रखडलेल्या कामांवरून ठेकेदारांना चांगलेच खडसावले. तसेच विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याचा इशारा देत निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
या आक्रमक पवित्र्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून अनेक ठिकाणी रखडलेली रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. सडे गाव ते सडे फाटा रस्त्याचे पूर्ण झालेले डांबरीकरण हे त्याचे ठळक उदाहरण आहे. बैठकीदरम्यान ठेकेदारांनी दिलेल्या अंतिम मुदतीनुसार काम पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली असून पुढील आठवड्यात वारी–कान्हेगाव रस्त्याचे कामही सुरू होणार आहे.
मतदारसंघातील नागरिकांनी या घडामोडींमुळे समाधान व्यक्त केले असून मुजोर ठेकेदारही यंत्रसामग्री जमवून कामे पूर्ण करण्यासाठी लगबग करत असल्याचे चित्र दिसत आहे. लवकरच मतदारसंघातील सर्व रखडलेली रस्त्यांची कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Post Views:
16






