कोपरगावात अजितदादांना  सर्वपक्षीय शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली —

कोपरगावात अजितदादांना  सर्वपक्षीय शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली —

In Kopargaon, Ajitdada was paid heartfelt tributes at an all-party condolence meeting.

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन, Sat31Jan.21.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: स्वर्गीय अजित दादांच्या निधनाने केवळ कोपरगावच नव्हे, तर महाराष्ट्रानेही एक दूरदृष्टीसंपन्न, कार्यकर्त्यांना मायेने सांभाळणारा नेता गमावला. त्यांच्या जाण्याने वेळेचे भान, माणुसकीची साथ आणि विकासाची दृष्टी हरपली, अशी भावना माजी आमदार अशोक काळे यांनी व्यक्त केली.

अशोक काळे म्हणाले, “अजित दादांना वेळेचे काटेकोर भान, कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेण्याची विलक्षण क्षमता आणि निर्णय घेण्याची अद्भुत दृष्टी होती. माझे आणि त्यांचे नाते फक्त राजकीय नव्हते, तर भावासारखे जिव्हाळ्याचे होते. आशुतोषलाही त्यांनी आपल्या मुलासारखे प्रेम दिले आणि त्याचे सर्व हट्ट मायेने पूर्ण केले. कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला.”

जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे म्हणाल्या, “कोपरगावच्या हक्काचा माणूस गमावल्याने हा दुःखद क्षण आहे. दादांनी नेहमी आशुतोषला पाठबळ दिले, स्वतःचे प्रश्न समजून सोडवले, आणि कोपरगाव मतदार संघाच्या प्रत्येक समस्येची नेमकी जाण ठेवली. प्रत्येक भेटीला काही ना काही दिले, कधीही रिकामं हाती पाठवले नाही. त्यांच्या उपस्थितीमुळे ग्रामीण भागातील प्रगतीला नेहमी नवे पंख मिळाले.”

दादांनी नेहमी नवीन पिढी घडवण्याचा प्रयत्न केला, शिस्त लावली, शिकवले, आणि त्यांच्या संकल्पाने कोपरगाव पुढे जाण्यास मार्ग मिळाला. त्यांनी मोठमोठाले प्रकल्प स्वीकारले, त्यात स्वतः लक्ष घालून मदत केली. “प्रत्येकाला समान प्रेम आणि मार्गदर्शन मिळाले,” असे चैताली काळे म्हणाल्या.

दादांना मासे खूप आवडायचे; जेवणात गवारची भाजी व भाकरी पसंत होती. त्यांनी आशुतोषला जावई म्हणून सुरुवात केली आणि लवकरच तो मुलासारखा झाला. २०१४ च्या निवडणुकीत आशुतोष पडल्यानंतरही त्यांनी मोठा आधार दिला. आज त्यांच्या जाण्याने मनात अपूरणीय दु:ख आहे; त्यांनी दिलेल्या प्रेम, संस्कार, राजकीय आणि वैयक्तिक धडे कधीच विसरता येणार नाहीत. आठवणींना उजाळा देताना  गहिवरून आल्याने त्यांना आपल्या दोन्ही डोळ्यातून ओघळणारे अश्रू त्यांना आवरता येत नव्हते दोन्ही डोळ्यातून घळाघळा वाहणाऱ्या अश्रूंमुळे बोलताना त्यांचा कंठ दाटून येत होता.

विवेक कोल्हे म्हणाले, “दादांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव, बारामती, पिंपरी-चिंचवड आणि विदर्भातील अनेक प्रकल्प यशस्वी झाले. शेतकरी, ग्रामीण भाग, उद्योग, सिंचन आणि सहकार क्षेत्रातील काम इतक्या नीटनेटके पद्धतीने उभारले की आजही त्यांचा परिणाम स्पष्ट दिसतो. दादांनी लोकांचा, कार्याचा आणि वेळेचा आदर करण्याची शिकवण दिली. त्यांनी कुठल्याही प्रकल्पासाठी निर्णय न्याय्य, प्रभावी आणि लोकहितासाठी घेतला.”

दादांच्या कार्यातून शिस्त, लोकांशी संवाद, सहकाराची भावना, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, आणि युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याची ताकद दिसून येते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभे केलेले बारामती मॉडेल, सहकार क्षेत्र, उद्योग, शेतकरी विकास, आणि लोकहिताचे प्रकल्प आजही कार्यरत आहेत.

दादा, आपण नसाल तरी आपले कार्य, संस्कार आणि मार्गदर्शन सदैव आमच्या हृदयात जिवंत राहतील. ते नेहमी म्हणायचे – “मी असेन की नसेन, पण कार्यातून दिसेन.” त्यांच्या मार्गदर्शनाचा ठसा सदैव राहणार आहे, आणि हा आदर्श प्रत्येक कार्यकर्त्यास प्रेरणा देतो. त्यांचा कोणताही चांगला गुण अवगत करूया हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अशा भावना विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.

 शनिवारी (३१) रोजी दुपारी चार वाजता कलश बँक्वेट हॉल या ठिकाणी झालेल्या शोकसभेत नगराध्यक्ष पराग संधान, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे, महिला जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे, उद्धव ठाकरे सेनेचे भरत मोरे, प्रमोद लबडे, प्रशांत वाबळे, दीपक साळुंके, नसीर भाई सय्यद, कैलास शेठ ठोळे यासह अनेक मान्यवरानी श्रद्धांजली अर्पित केली. सूत्रसंचालन शिवाजी ठाकरे यांनी केले, तर पसायदानाने शोकसभेची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

You cannot copy content of this page