जुन्नर तालुक्याची पहिली एम.डी. पॅथॉलॉजिस्ट — डॉ. पूर्वा ओंकार भालेराव यांची ऐतिहासिक झेप

जुन्नर तालुक्याची पहिली एम.डी. पॅथॉलॉजिस्ट — डॉ. पूर्वा ओंकार भालेराव यांची ऐतिहासिक झेप

Dr. Purva Omkar Bhalerao makes history as the first M.D. Pathologist from Junnar taluka.

जिद्द, सातत्य आणि गुणवत्तेच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रात नवे शिखर

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed21 Jan 20.15Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव  : जिद्द, सातत्य आणि गुणवत्तेच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, याचा प्रेरणादायी वस्तुपाठ नारायणगावच्या डॉ. पूर्वा ओंकार भालेराव यांनी घालून दिला आहे. एम.डी. पॅथॉलॉजी (M.D. Pathology) ही पदव्युत्तर वैद्यकीय पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण करत त्या जुन्नर तालुक्यातील पहिल्या एम.डी. पॅथॉलॉजिस्ट ठरल्या आहेतहा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण तालुक्याच्या वैद्यकीय इतिहासातील मैलाचा दगड आहे.

डॉ. पूर्वा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथून एम.डी. पॅथॉलॉजी पूर्ण केली. त्याआधी एम.बी.बी.एस. शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे यशस्वीरीत्या पूर्ण केले. दहावी–बारावीपासूनच गुणवत्तेची परंपरा जपणाऱ्या डॉ. पूर्वा यांच्या यशामागे शिस्तबद्ध अभ्यास, अथक परिश्रम आणि उद्दिष्टाप्रती अढळ निष्ठा ही त्रिसूत्री ठळकपणे दिसून येते.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, ४० वर्षांपूर्वी जुन्नर तालुक्यातील पहिली पॅथॉलॉजी लॅब उभारण्याचा मान त्यांच्या वडिलांना—नारायणगावचे ज्येष्ठ व प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. ओंकार भालेराव—यांना मिळाला होता. त्या वैद्यकीय वारशाला नवे उंच शिखर गाठून देत डॉ. पूर्वा यांनी तालुक्याच्या आरोग्यसेवेत नवा अध्याय लिहिला आहे.

या उज्ज्वल यशाबद्दल आमदार शरद दादा सोनवणे, माजी आमदार अतुल शेठ बेनके, खासदार डॉ. अमोल कोल्हे, तसेच अखिल भारतीय गुरव समाजाचे अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे व कार्याध्यक्ष शीतल शिंदे (नगरसेवक, पिंपरी–चिंचवड महापालिका) यांनी त्यांचे अभिनंदन केले. नारायणगाव डॉक्टर असोसिएशनच्या वतीनेही त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

डॉ. पूर्वा भालेराव या गणपती ओझर देवस्थानचे माजी विश्वस्त कै. गजानन भालेराव सर यांच्या नात असून, नारायणगाव येथील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. ओंकार भालेराव यांची कन्या आहे गणपती ओझरच्या मातीतील ही कन्या आज जुन्नर तालुक्याची पहिली एम.डी. पॅथॉलॉजिस्ट म्हणून वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल ओळख निर्माण करत आहे. तिची ही यशोगाथा नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page