कोपरगावच्या शिवारात २२ हेक्टरवर “हिरवी सोन्याची लागवड’  ‘

कोपरगावच्या शिवारात २२ हेक्टरवर “हिरवी सोन्याची लागवड’  ‘

‘Green gold’ cultivation on 22 hectares in the Kopargaon area.

मनरेगाच्या बळावर केळी उत्पादनाची नवी क्रांती; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन, Fir6Feb.12.40 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :दुष्काळ, खर्चिक शेती आणि अनिश्चित बाजारपेठेच्या छायेत अडकलेल्या कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी केळी उत्पादन आशेचा नवा किरण ठरत आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत आता तालुक्यातील शेतकरी मोठ्या आत्मविश्वासाने केळी या नगदी फळपीकाकडे वळताना दिसत आहेत. आणि या बदलामागे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

मनरेगा अंतर्गत तालुक्यात सुमारे २२ हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड यशस्वीपणे करण्यात आली असून, यामुळे शेतकऱ्यांना रोजगारासोबतच दीर्घकालीन उत्पन्नाचा मजबूत आधार मिळत आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेत शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे टाकलेले पाऊल आता फळास येताना दिसत आहे.

आज दि. ४ फेब्रुवारी रोजी मौजे रवंदे येथे जिल्हाधिकारी पंकज आशिया  यांनी मनरेगा अंतर्गत उभारलेल्या केळी लागवड क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत केळी पिकाची वाढ, व्यवस्थापन, उत्पादनक्षमता तसेच योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक लाभांची सखोल माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या अनुभवातून समाधान व्यक्त होत असतानाच, ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरत असल्याचे स्पष्ट झाले.

रवंदे येथील रवंदे शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांनी या योजनेचा प्रभावी उपयोग करून केळी लागवडीद्वारे उत्पादनवाढीचा नवा मार्ग स्वीकारला आहे. सामूहिक प्रयत्न, शासकीय पाठबळ आणि बाजाराभिमुख शेती यांचा संगम साधत हे शेतकरी इतरांसाठी आदर्श ठरत आहेत.

कृषी विभागामार्फत, “पारंपरिक पिकांना योग्य पर्याय म्हणून केळीसारख्या फळपिकांचा अवलंब करून उत्पन्नवाढ साधावी व शासनाच्या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा,” असे आवाहन करण्यात आले आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेतीकडे जाण्याचा हा मार्ग असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

या पाहणीप्रसंगी शिर्डीचे प्रांताधिकारी श्री. माणिक आहेर, तहसीलदार  महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी  मनोज सोनवणे, रवंदे शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक  प्रवीण कदम, मंडळ कृषी अधिकारी श्रीमती तेजस्वी मोटे, उप कृषी अधिकारी  राजेश तुंबारे, सहाय्यक कृषी अधिकारी  योगेश माळी यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

कोपरगावच्या शिवारात उगवलेली ही केळीची लागवड केवळ पीक नाही, तर शेतकऱ्यांच्या स्वावलंबनाची, आत्मविश्वासाची आणि समृद्धीची नवी ओळख ठरत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page