भोगवटदार ९ गावांतील ५६ शेतकऱ्यांना मालकीचा हक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप
Ownership rights distributed to 56 farmers from 9 villages by the District Collector.
कुळाने मिळालेल्या वर्ग–२ जमिनींचे वर्ग–१ मध्ये रुपांतर;
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन, Fir6Feb.12.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगाव तालुक्यातील भोगवटदार शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, कुळाने मिळालेल्या भोगवटदार वर्ग–२ जमिनींचे वर्ग–१ मध्ये रूपांतर करून नऊ गावांतील ५६ शेतकऱ्यांना थेट मालकी हक्काचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते बुधवारी कोपरगाव तहसील कार्यालयात या जमिनींचे अधिकृत वाटप झाले.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी बुधवारी (दि. ४) कोपरगाव तहसील कार्यालयास भेट देत जमिनींचे वाटप केले. यावेळी त्यांनी तहसील व इतर कार्यालय प्रमुखांच्या कामकाजाचाही सविस्तर आढावा घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त शासनाने जाहीर केलेल्या ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत हा निर्णय अमलात आणण्यात आला. कुळ कायदा कलम ४३ (नियंत्रित सत्ता प्रकार) अन्वये कुळास मिळालेल्या जमिनी खरेदी करून दहा वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण झालेल्या प्रकरणांमध्ये हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आणि तहसीलदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी दप्तरी शोधमोहीम राबवत पात्र शेतकऱ्यांची निवड केली.
या उपक्रमाचा लाभ खिडींगणेश (२३), वारी (१३), गोधेगाव (११), आपेगाव (४), येसगाव (१), आंचलगाव (१), संवत्सर (१), चांदेकसारे (१) व पोहेगाव (१) येथील शेतकऱ्यांना मिळाला.
कुळाने मिळालेल्या जमिनींवर आता वर्ग–१चा स्पष्ट मालकी हक्क मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, हा उपक्रम इतर तालुक्यांसाठीही मार्गदर्शक ठरणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे, अशी माहिती नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी दिली.
Post Views:
7





