गड-किल्ले, देवालये आणि विज्ञानविश्व; संत ज्ञानेश्वरच्या विद्यार्थ्यांची समृद्ध शैक्षणिक सहल
Forts, temples and the world of science; a rich educational trip for the students of Sant Dnyaneshwar School.
सिंहगड ते शनिवारवाडा:पुस्तकातील इतिहास गडावर जिवंत अनुभवला
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन, Fir6Feb.13.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : इतिहास केवळ धड्यापुरता न राहता तो प्रत्यक्ष अनुभवातून समजावा, यासाठी संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगावच्या विद्यार्थ्यांनी दोन दिवसीय शैक्षणिक सहलीतून गौरवशाली महाराष्ट्राचा जिवंत इतिहास अनुभवला.
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधत आयोजित या सहलीत विद्यार्थ्यांनी ‘गड आला पण सिंह गेला’ या अजरामर पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सिंहगडावर पाऊल ठेवत इतिहासाला प्रत्यक्ष भेट दिली.
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी संचालक विशाल झावरे यांच्या नेतृत्वाखाली सहलीचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या सहलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सिंहगडावर शौर्याचा जयघोष सहलीची सुरुवात सिंहगडाच्या चढाईने झाली. तानाजी मालुसरे स्मारक, तानाजी कडा, तोफखाना, कल्याण दरवाजा तसेच छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळी विद्यार्थ्यांनी नतमस्तक होत शिवकालीन शौर्याचा इतिहास ऐकला. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे तानाजी मालुसरे यांचा पराक्रम विद्यार्थ्यांच्या मनात कोरला गेला. गडावरील पारंपरिक पिठलं-भाकरीचा आस्वाद घेत सहलीचा आनंद द्विगुणित झाला.
भक्ती, शक्ती आणि विज्ञानाचा संगम
या सहलीत विद्यार्थ्यांनी केवळ गडच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक व वैज्ञानिक वारशाचेही दर्शन घेतले.देहू व आळंदी येथे संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी नमन केले.मोशी येथील भव्य छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, तुळापूर येथील समाधीस्थळ व पुण्यातील शनिवारवाडा येथे शिवकालीन इतिहासाची प्रचिती आली.
पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कमध्ये विज्ञानाचे प्रयोग अनुभवताना विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिर व रांजणगाव महागणपती दर्शनाने सहलीला आध्यात्मिक अधिष्ठान लाभले.
चौकट : सांघिकतेचे आणि संस्कारांचे बाळकडू
कार्यकारी संचालक विशाल झावरे म्हणाले, “विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यात साहस, शिस्त आणि इतिहासाबद्दल अभिमान निर्माण करणे, हाच या सहलीचा उद्देश आहे. गड-किल्ल्यांचे संवर्धन ही जबाबदारी भावी पिढीची असून विद्यार्थी यापासून प्रेरणा घेत आहेत.-”कार्यकारी संचालक विशाल झावरे
अत्यंत शिस्तबद्ध, सुरक्षित व नियोजनबद्ध वातावरणात पार पडलेल्या या सहलीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. इतिहासाची शिदोरी घेऊन आनंदी चेहऱ्याने विद्यार्थी कोपरगावात परतले, तेव्हा पालकांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
Post Views:
10






