कोपरगावच्या शैक्षणिक परंपरेला संत ज्ञानेश्वर स्कूलमुळे जागतिक ओळख; – डॉ. विजय ठाणगे

कोपरगावच्या शैक्षणिक परंपरेला संत ज्ञानेश्वर स्कूलमुळे जागतिक ओळख; – डॉ. विजय ठाणगे

Kopargaon’s educational tradition has gained global recognition due to Sant Dnyaneshwar School; – Dr. Vijay Thange

शाळेपासून NASAपर्यंत : गुणवत्तेची उंच झेप | शिक्षण, संस्कार आणि यशाचा त्रिवेणी संगम

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb Tue10.13.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीचा प्रेरणादायी असून माजी विद्यार्थी रोहित पवार यांच्या NASA मधील योगदान ही “ जागतिक स्तरावर पोहोचलेली कामगिरी शाळेच्या गुणवत्तेचे प्रतीक असल्याचे गौरव उद्गार ”संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात के.जे.सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनीअध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे संस्थापक राजेंद्र झावरे, प्राचार्य डॉ विजय ठाणगे,नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे,पत्रकार राजेंद्र सालकर, को.ता.पतसंस्था चेअरमन पोपट झुरळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीपमामा सोनवणे,ॲड.शंकर यादव, मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे, प्राचार्य सचिन मोरे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व  पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. ठाणगे म्हणाले, “इंग्लिश मीडियम असली तरी भारतीय ज्ञानपरंपरेचे संवर्धन हे शाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे. स्थापत्यकला, शिल्पकला, सांस्कृतिक वारसा व परंपरा विद्यार्थ्यांना शिकवण्यावर शाळा भर देते.”

शाळेच्या शंभर टक्के निकालाचे श्रेय त्यांनी शिक्षक, विद्यार्थी व संस्थेच्या एकत्रित प्रयत्नांना दिले. विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.

डिजिटल युगातील आव्हानांवर भाष्य करताना प्राचार्यांनी पालकांना मोबाईल व स्क्रीन-टाईम मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले. “पुस्तकांच्या सान्निध्यातूनच खरी बौद्धिक समृद्धी मिळते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“धनाला नव्हे, ज्ञानाला किंमत देणारी ही शाळा आहे,” असे सांगत गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि यशाचा त्रिवेणी संगम घडवण्याचा शाळेचा संकल्प अधोरेखित केला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सालकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. विद्यार्थ्यांची खरी ओळख केवळ गुणपत्रिकेपुरती मर्यादित नसून त्यांच्या कलागुणांमध्ये, छंदांमध्ये आणि व्यक्तिमत्त्वात दडलेली असते, असे ते म्हणाले. शाळा ही संस्कार, शिस्त, मैत्री आणि आत्मविश्वास घडवणारी पवित्र जागा असून शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सकारात्मक प्रोत्साहन यामुळेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळकट होतो, असे त्यांनी सांगितले. पालकांनी मुलांची इतरांशी तुलना न करता त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करावे, असे आवाहन करत त्यांनी आधुनिक शिक्षणासोबत भारतीय संस्कृती जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी शाळेच्या शैक्षणिक, क्रीडा व विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे विशेष कौतुक केले. शाळेने यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. शाळा सुरू करताना ज्या अपेक्षा होत्या, त्यापेक्षा आज येथे विद्यार्थ्यांना अधिक सुविधा, संधी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. क्रीडा व विज्ञान शिक्षणाला दिलेले महत्त्व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला पोषक ठरत असल्याचे सांगत या यशामागे शाळा व्यवस्थापनाची दूरदृष्टी, शिक्षकांचे समर्पण आणि पालकांचा विश्वास असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.

मान्यवरांचा परिचय – शिक्षिका चैताली पुंडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन – शिक्षिका वैष्णवी काळे मॅडम व गीतांजली आहेर मॅडम यांनी केले तर आभार शिक्षिका उमा गिरमे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page