शास्ती माफीवरून कोपरगावात श्रेययुद्ध पेटले; ‘वरातीमागून घोडे’ म्हणत रणशूरांचा आमदार काळेंवर घणाघात
A battle of wits broke out in Kopargaon over the pardon; Ranshura MLA attacks Kale, saying ‘Horses are after you’
१०० टक्के शास्ती माफीसाठी निवेदनानंतर राजकीय वातावरण तापले; नागरिकांच्या प्रश्नांवरून आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb Wad11.9.20 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेतील थकीत मालमत्ता करावरील १०० टक्के शास्ती माफीच्या मुद्द्यावरून शहरात राजकीय श्रेययुद्धाला जोर चढला आहे. आमदार काळे यांनी नागरिकांना शंभर टक्के शास्ती माफी मिळावी यासाठी शासन दरबारी भेट घेऊन निवेदन सादर केल्याचा दावा केल्यानंतर, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी त्यांच्यावर सडकून टीका करत ‘ही धडपड म्हणजे वरातीमागून घोडे’ असा सणसणीत टोला लगावला. परिणामी, नागरिकांच्या करमाफीच्या प्रश्नावरून कोपरगावात आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण चांगलेच पेटले आहे.
नगरपालिकेच्या हद्दीत सुमारे १८ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांवर कोट्यवधी रुपयांची शास्ती आकारण्यात आली आहे. वाढत्या आर्थिक ताणामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी व मध्यमवर्गीय कुटुंबे हैराण झाली असताना शास्ती माफीचा मुद्दा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर विविध स्तरांतून शासनाकडे पाठपुरावा सुरू असताना आमदार काळे यांनी पुढाकार घेतल्याचा दावा केला; मात्र यावरूनच राजकीय वादाची ठिणगी पडली.
“सत्ता हातात असताना जनतेच्या करभाराकडे डोळेझाक करणारे आता श्रेयासाठी धावपळ करत आहेत. निर्णयाची चाहूल लागताच निवेदनांचे फोटोसेशन सुरू झाले. ही केवळ प्रसिद्धीची धडपड असून वरातीमागून घोडे आणण्याचा प्रकार आहे,” असा रोखठोक आरोप उपनगराध्यक्ष रणशूर यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
दरम्यान, आमदार काळे यांच्या समर्थकांकडूनही प्रतिउत्तराची तयारी सुरू असून ‘नागरिकांच्या हितासाठी कोणत्याही पातळीवर लढू’ असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे शास्ती माफीच्या मूळ प्रश्नापेक्षा श्रेयाच्या राजकारणालाच अधिक ऊत आल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
नागरिक मात्र करमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. शंभर टक्के शास्ती माफी लागू झाल्यास हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे; परंतु तोपर्यंत कोपरगावात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे वारे आणखी वेगाने वाहणार, हे मात्र स्पष्ट झाले आहे.
Post Views:
22





