सतरा – खतरा : पोहेगाव पाच दिवस टोटल बंद – सरपंच औताडे
वृत्तवेध ऑनलाईन। 7 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 15:23
कोपरगाव : परवा सापडलेल्या पोहेगाव येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून रूग्नांची संख्या १७ वर पोहोचली आहे. पोहेगाव पाच दिवस टोटल बंद करण्यात आले असल्याची माहिती सरपंच अमोल औताडे यांनी दिली.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढणारी संख्या ही अतिशय चिंताजनक बाब असून गावातील प्रत्येक नागरिकांनी आपली काळजी घेणे गरजेचे आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत आजपासून पाच दिवस शनिवार ते बुधवार पर्यंत संपूर्ण गावातील व्यवहार बंद राहतील. नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन अमोल औताडे यांनी केले आहे.
पोहेगांव येथील कोरोना दक्षता टिमही सक्रिय झाली असून विनाकारण फिरणारावर कारवाई तसेच माक्स न वापरणाऱ्या व्यक्तींना दंडाची कारवाई करण्याचा पवित्रा ग्रामपंचायतीच्या वतीने घेतला आहे.
संजीवनी येथील व भजनी मंडळातील सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कातील ५० संशयित रुग्णाचे स्त्राव कोविड सेंटरला तपासणीसाठी पाठवले होते. सकाळी ११ पैकी ४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पोहेगावात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. नितीन बडदे यांनी कल्पना दिल्यानंतर लगेचच शिवसेना नेते नितीन औताडे, सरपंच अमोल औताडेे, उपसरपंच प्रशांत रोहमारे , ग्रामविकास अधिकारी रामदास काळे व पोहेगाव कोरोना दक्षता टीम व आरोग्य यंत्रणेची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना नेते नितीन औताडे यांनी कोरोणा विषाणूला रोखण्यासाठी व त्याची साखळी तोडण्यासाठी सरपंच अमोल औताडे व ग्रामविकास रामदास काळे यांना गावची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करत गांव बंद ठेवण्याची सुचना केली. त्यांच्या सूचना गांभीर्याने घेत आज शनिवार दिनांक ८ ऑगस्ट ते बुधवार दिनांक १२ ऑगस्ट पर्यंत पोहेगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
जीवनावश्यक वस्तूसह सर्व व्यवहार दवाखाना व मेडिकल देखील बंद राहणार आहे.
प्रशासनाच्या वतीनेही पोहेगावातील कोरोना व्हायरस ची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे. कोरोना बाधित परिसरातील सर्व भाग सील करण्यात आले आहे.
विनाकारण कोणी रस्त्यावर व इतरत्र फिरताना दिसल्यास ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने त्या व्यक्तीवर योग्य कारवाई करण्यात येईल तसेच त्या व्यक्तीला आर्थिक स्वरूपाचा दंडही केला जाईल असे ग्राम विकास अधिकारी रामदास काळे यांनी सांगितले.





