शिर्डीचे पहिले पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब गोर्डे यांचे निधन
शिवसेनेचे नितीन औताडे यांचे सासरे
वृत्तवेध ऑनलाईन। 7 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 15:23
कोपरगाव : शिर्डी पोलीसउपविभागीय कार्यालयाची स्थापना झाल्यानंतर पहिले दोन वर्षे पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवा केलेले निवृत्त पोलिस उपाधिक्षक अण्णासाहेब गोर्डे यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुणे येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. अत्यंत कर्तबगार संयमी आणि गुन्ह्याचा छडा लावणारे पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांची पोलीस खात्यात ख्याती होती. जवळपास ३५ वर्षे त्यांनी सेवा केली. १९८५ साली धुळे येथे असताना जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागांमध्ये सर्वात मोठा धर्मा भास्कर घोटाळा झाला होता.त्यामध्ये मुख्य तपासी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले होते. या घोटाळ्याचा छडा त्यांनी लावला होता.तद्नंतर उल्हासनगर ,भिवंडी, ठाणे, नारकोली, कल्याण अशा संवेदनशील पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी काम केले. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अनेक घटना उघडकीस केल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली ,सुना नातवंडे असा परिवार आहे. ते शिवसेना नेते, पोहेगाव नागरी पतसंस्थेचे संस्थापक नितीनराव औताडे यांचे सासरे , महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सीमाताई औताडे, सचिन गोर्डे यांचे वडील होते.