कोपरगाव नगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव २०२६ उत्साहात साजरा

कोपरगाव नगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव २०२६ उत्साहात साजरा

Kopargaon Municipality celebrates Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 with enthusiasm

अभिषेक, मानवंदना, सैनिकी बँड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी कोपरगावात देशभक्तीची उधळण

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb20 Fir.17.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव,  : शिवजयंतीच्या पावन पर्वानिमित्त कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव २०२६ भव्य आणि दिमाखदार स्वरूपात साजरा करण्यात आला. सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरिक, विद्यार्थी, शिवभक्त आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.

सकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

संजीवनी स्कूल, आत्मा मालिक प्यारा मिलिटरी स्कूल, डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यामंदिर, एस. जी. विद्यालय, के. बी. पी. विद्यालय तसेच एनडीए अकॅडमी आणि ५७ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलन करत छत्रपती शिवाजी महाराजांना विविध शाळा व महाविद्यालयांच्या एनसीसी तुकड्यांनी शिस्तबद्ध मानवंदना दिली. विद्यार्थ्यांच्या टापटीप वेशभूषा आणि सुसंगत पथसंचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सायंकाळी ६.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.संत ज्ञानेश्वर इंग्लीश मिडीयम स्कूल, संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कूल, पदमा मेहता प्राथमिक विद्यालय, भागचंद माणिकचंद ठोळे प्राथमिक विद्यालय, के.बी.पी. माध्यमिक विद्यालय, लायन्स मुक-बधिर विद्यालय, डॉ. सी.एम. मेहता कन्या विद्यामंदिर, एम. के. आढाव माध्यमिक विद्यालय, विद्याप्रबोधिनी प्राथ. व माध्य. विद्यालय, आत्मा मालिक ओम गुरूदेव गुरूकुल, कोकमठाण आत्मा मालिक ओम गुरूदेव इंग्लीश मिडीयम स्कूल, के.जे. सोमय्या कॉलेज, शांभवी ग्रुप या शाळा व महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

देशात प्रथम क्रमांक मिळवलेल्या संजीवनी सैनिकी स्कूलच्या ब्रास बँड पथकाचे विशेष सादरीकरण हा कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षणबिंदू ठरला. त्यांच्या सुसंवादी आणि दमदार वादनाने उपस्थितांची मने जिंकली. बँडच्या तालावर सादर झालेल्या देशभक्तीपर धूनांनी वातावरण भारावून गेले. स्वागत मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केले तर प्रास्ताविक नगराध्यक्ष पराग संधान यांनी केले.

याशिवाय विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित नृत्यनाट्य, पोवाडे, समूहगीत आणि देशभक्तीपर नृत्य सादर केले. महाराजांच्या शौर्यगाथा आणि स्वराज्य स्थापनेचा इतिहास रंगमंचावर जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या अभिनयाला आणि सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार स्नेहलता कोल्हे होत्या. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नगराध्यक्ष पराग संधान, मुख्याधिकारी सुहास जगताप, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे तसेच संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सर्व नगरसेवक व नगरपालिका अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने हा उत्सव यशस्वीरीत्या पार पडला.

आपल्या मनोगतात स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांचे स्वराज्य, न्याय, स्त्री-सन्मान आणि सर्वधर्मसमभाव ही तत्त्वे आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत. “ही मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात रुजविली तरच महाराजांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल,” असे त्यांनी नमूद केले. विवेकभैय्या कोल्हे यांनी तरुणांना शिस्त, धैर्य आणि प्रामाणिकपणाच्या बळावर समाजकार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान लायन्स मुक-बधिर विद्यालयास ११ हजार रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. तसेच संजीवनी सैनिकी स्कूलच्या ब्रास बँड पथकाचा विशेष सन्मान करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.

दिवसभर चाललेल्या विविध उपक्रमांमुळे कोपरगावात शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नगरपरिषद आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे शिवजयंती उत्सव २०२६ संस्मरणीय ठरला.

चौकट

देशात नावलौकिक मिळवलेल्या व प्रथम क्रमांक संपादन केलेल्या संजीवनी सैनिकी स्कूलच्या बँड पथकाने अतिशय मंत्रमुग्ध करत शिवप्रेमी नागरिकांची मने जिंकली.

Leave a Reply

You cannot copy content of this page