““अपयशातून शिका, “प्रोजेक्ट-केंद्रित शिक्षणच यशाची खरी गुरुकिल्ली” – अमित कोल्हे
“Learn from failure, “Project-centered learning is the real key to success” – Amit Kolhe
कोपरगावात ‘डिपेक्स’चा जल्लोष; ४०० प्रकल्प, १७०० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb19 Thu.11.30 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : “स्पर्धा ही जिंकण्यासाठी नव्हे, तर शिकण्यासाठी असते. अपयशातून शिकून अधिक जिद्दीने पुढे जाणे हीच खरी प्रगती आहे,” असे ठाम प्रतिपादन अमित कोल्हे यांनी केले. प्रोजेक्ट-केंद्रित शिक्षण हीच विद्यार्थ्यांच्या ज्ञानप्रकाशाची खरी वाट असल्याचे सांगत त्यांनी नवोन्मेषातून ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकार करण्याचा ध्यास विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प्रायोजित आणि संजीवनी युनिव्हर्सिटी आयोजित राज्यस्तरीय तांत्रिक प्रकल्प स्पर्धा ‘डिपेक्स’ च्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ देणाऱ्या या उपक्रमात अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील विविध संस्थांमधील तब्बल ४०० प्रकल्प आणि सुमारे १७०० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
नवसंशोधनाची ऊर्जा, राष्ट्रनिर्मितीची दिशा
विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून शिकले पाहिजे, असे सांगताना अमित कोल्हे म्हणाले की, “विद्यार्थ्यांचे खरे ज्ञान त्यांच्या प्रोजेक्टमधून दिसून येते.” संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दूरदृष्टीचा उल्लेख करत त्यांनी विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक-आधारित मूल्यांकन पद्धतीची माहिती दिली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’च्या संकल्पनेचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, अशा नवोन्मेषी उपक्रमांमुळे भारत जागतिक नेतृत्वासाठी सक्षम होईल. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, उद्योजकता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचेही अमित कोल्हे यांनी अधोरेखित केले.
‘डिपेक्स’चा प्रवास : १६ प्रकल्पांपासून ६५०० प्रकल्पांपर्यंत
‘डिपेक्स’ची सुरुवात १९८६ साली वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे अवघ्या १६ प्रकल्पांपासून झाली होती. आज महाराष्ट्र व गोवा राज्यांतील १३ केंद्रांवर विस्तारलेल्या या स्पर्धेत सुमारे ६५०० प्रकल्पांचा सहभाग नोंदविला जात असून तिचा व्याप लक्षणीय वाढला आहे. कोपरगाव केंद्रावरील आयोजनाने यंदा विशेष लक्ष वेधून घेतले.
उद्घाटन समारंभाला श्री साईटेक इंजिनीअरिंग एलएलपीचे डायरेक्टर व संजीवनी के.बी.पी. पॉलिटेक्निकचे माजी विद्यार्थी सचिन देशमुख प्रमुख उपस्थित होते. यावेळी व्हाईस चान्सलर डॉ. ए. जी. ठाकूर, इंजिनिअरिंग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते तसेच विद्यार्थी परिषद पदाधिकारी देवेंद्र देशमुख, श्रावणी बचाल, आयुष पारीख आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट
कोपरगावात भरलेल्या डीपेक्समुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नवे पंख लावले असून नवोन्मेषाच्या ऊर्जेतून विकसित भारताच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल ठरत आहे
Post Views:
2





