एससी राखीव जागेवरील भाजप उपनगराध्यक्षांचा जात दाखला रद्द करा : सागर आहेर यांचा थेट हल्ला!

एससी राखीव जागेवरील भाजप उपनगराध्यक्षांचा जात दाखला रद्द करा : सागर आहेर यांचा थेट हल्ला!

Cancel the caste certificate of BJP Deputy Mayor on SC reserved seat: Sagar Aher’s direct attack!

वडिलांच्या स्कूल व सर्विस रेकॉर्डवरील  नोंदींचा दाखला देत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील, 

आणखी ४-५ नगरसेवकांवरही कायदेशीर कारवाईचे सुतोवाच 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb23 Mon.18.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र. ९-अ (एससी राखीव) मधून भाजप कोल्हे गटाच्या पाठिंब्यावर निवडून आलेले उपनगराध्यक्ष जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांच्याविरोधात जात दाखल्यावरून राजकीय रणसंग्राम पेटला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सागर निंबा आहेर यांनी रणशूर यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढवून जिंकली असल्याचा गंभीर आरोप करत जिल्हाधिकारी तसेच जात पडताळणी कार्यालयाकडे अपील दाखल केले आहे.

आहेर यांचे वकील ॲड . मुन्ना सय्यद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना थेट आरोपांची सरबत्ती केली. “एससी राखीव प्रभागातून उमेदवारी घेताना सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये गंभीर विसंगती आहे. काही नोंदींमध्ये त्यांच्या वडिलांच्या ‘मॅथेलिस्ट प्रायमरी स्कूल’पुणतांबा शाळा सोडल्याच्या दाखल्यावर “ख्रिस्ती’ धर्मीय उल्लेख प्रथमदर्शनी दिसतात. तसेच शासकीय सेवेत असताना सर्व्हिस रेकॉर्डवर ‘इंडियन ख्रिश्चन’ अशी नोंद आहे,” असा दावा त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर शिर्डी प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेल्या जात प्रमाणपत्रालाही आव्हान देण्यात आले असून त्याविरोधातही जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्यात आले आहे. “चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढवून जिंकली. त्यामुळे हा जातीचा दाखला रद्द करावा,” अशी मागणी आहेर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ

ॲड.सय्यद यांनी यावेळी आणखी मोठा दावा करत सत्ताधारी गटातील चार ते पाच नगरसेवकांच्या प्रकरणांची तपासणी सुरू असल्याचे सांगितले. “वेगवेगळ्या कारणांवरून त्यांच्याविरोधातही लवकरच कायदेशीर आव्हान दाखल केले जाईल. थोडक्यात काहींच्या मानेवर कारवाईची टांगती तलवार आहे,” असा इशारा त्यांनी दिला. संबंधितांची नावे जाहीर न केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

अंचलगाव प्रकरणाचा दाखला

ॲड. सय्यद यांनी यावेळी दोन महिन्यांपूर्वी अंचलगाव येथील सरपंचांनी धनगर समाजातील असताना मुलाला ‘हिंदू खाटीक’ दाखवून गायरान जागेवर अतिक्रमण करून घरकुलाचा लाभ घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आणि त्यांचे सरपंचपद रद्द झाले, असा दाखलाही  दिला. “कायद्यापुढे कोणीही मोठे नाही,” असे यावेळी त्यांनी ठणकावून सांगितले.

एससी राखीव जागेवरून पेटलेल्या या ‘जात’ वादामुळे भाजप कोल्हे गट अडचणीत येणार का, रणशूर यांच्या निवडीवर गंडांतर येणार का, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page