जगाच्या पोशिंद्याला बँक अधिकाऱ्यांनी सन्मानाची वागणूक द्यावी-आ. आशुतोष काळे

जगाच्या पोशिंद्याला बँक अधिकाऱ्यांनी सन्मानाची वागणूक द्यावी-आ. आशुतोष काळे

कोपरगाव

सातत्याने संकटाचा सामना करूनही आलेल्या परिस्थितीला तोंड देत प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी आपला पारंपारिक शेती व्यवसाय करीत आहे.शेतकरी अत्यंत प्रामाणिक असून शेतकरी कधीच कुणाला जाणून बुजून फसवत नाही. हे प्रत्येक बँक अधिकाऱ्यांनी समजून घेऊन जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व बँक अधिकाऱ्यांनी सन्मानाची वागणूक द्यावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या.

ज्या शेतकऱ्यांचे नाव महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत समाविष्ट झाले मात्र त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग झालेली नाही त्यामुळे पुढील कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करत आहेत अशा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी (दि.२५) रोजी कोपरगाव येथे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात अहमदनगर जिल्हा सहकारी बँक अहमदनगर तालुका विकास अधिकारी व राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेतली याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शेती व्यवसायाला नेहमीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेतल्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. मात्र कर्ज घेण्यासाठी पात्र असून देखील काही बँका शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी कर्ज देत नसल्याचे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. शासनाच्या अध्यादेशानुसार जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होऊन ज्या शेतकऱ्यांची नावे कर्जमाफी यादीत आली आहेत. मात्र कोरोना संकटामुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही अशा सर्वच शेतकऱ्यांना शासनाच्या (दि.२२ मे) अध्यादेशानुसार नवीन पिक कर्ज द्यावे. त्याचबरोबर लघुउद्योग करणारे सुशिक्षित-बेरोजगार, महिला बचत गट, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आदी छोट्या-मोठ्या व्यवसायांना देखील नियमानुसार कर्ज वाटप करावे. ज्या बँकांनी गावे दत्तक घेतली आहे त्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्या त्या गावात जाऊन शेतकऱ्यांना कर्जासंबंधी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. या बैठकी दरम्यान शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास येत असलेल्या अडचणी आमदार आशुतोष काळे यांनी जाणून घेतल्या. या बैठकीसाठी खासदार सदाशिव लोखंडे, सभापती सौ.पोर्णिमा जगधने, शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, अॅड.राहुल रोहमारे, राष्ट्रीयकृत बँकांचे एम.डी.वालावलकर आदी मान्यवरांसह जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.

फोटो ओळ- जिल्हा सहकारी बँक शाखाप्रमुख व राष्ट्रीयकृत बँकांचे शाखाप्रमुख यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे समवेत खासदार सदाशिव लोखंडे.

Leave a Reply

You cannot copy content of this page