रणांगणातून व्यासपीठावर… कोपरगावच्या राजकारणाला ‘समज’ येणार का?

रणांगणातून व्यासपीठावर… कोपरगावच्या राजकारणाला ‘समज’ येणार का?

From the Battlefield to the Podium… Will Kopargaon’s Politics Finally Find ‘Maturity’?

पहाट पाडव्याच्या निमित्ताने दिसली जवळीक; विकासासाठी हीच सलोख्याची गुढी उभारणार का नेते?

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 27Fir.16.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची तोफ डागत जनतेसमोर उभे ठाकलेले नेते… आणि अवघ्या काही महिन्यांतच सार्वजनिक व्यासपीठावर शेजारी बसून दिलखुलास गप्पा मारताना दिसणारे तेच चेहरे—हीच आपल्या स्थानिक राजकारणाची खरी वस्तुस्थिती आहे का, असा सवाल आता सर्वसामान्यांच्या मनात घर करू लागला आहे.

पहाट पाडव्याच्या शुभमुहूर्तावर युवा नेते विवेक कोल्हे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आणि नगराध्यक्ष पराग संधान  यांच्या उपस्थितीत एकत्रित गुढी उभारून नववर्षाची सुरुवात झाली. याच दिवशी मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने गेल्या ३२ वर्षांपासून सुरू असलेल्या सप्ताहाची सुरुवात झाली यावर्षी हभप. शिरीष महाराज बारी यांच्या सुमधुर वाणीतून “श्री नवनाथ भक्ती कथासार” प्रारंभ झाला आणि सप्ताह कथेची सांगता  देखील काका कोयटे व पराग संधान  याच नेत्यांच्या हस्ते झाली.

परंतु या धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात एक वेगळीच ‘राजकीय पटकथा’ रंगताना दिसली. तीन महिन्यांपूर्वी नगरपालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेले हेच नेते, आज मात्र व्यासपीठावर शेजारी बसून हसत-खेळत संवाद साधताना दिसले.

कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकानेही या बदलाचा हलक्याफुलक्या शब्दांत उल्लेख केला आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.प्रश्न मात्र इथेच निर्माण होतो—निवडणुकीपुरतीच का ही कटुता आणि कार्यक्रमापुरताच का हा सलोखा?कोपरगावकरांची अपेक्षा अगदी स्पष्ट आहे. निवडणुकीत लढा—तो दंड ठोकून लढा! पण विकासाच्या प्रश्नावर मात्र राजकारणाचे कुरघोडीचे डाव, शह-काटशह यांचा खेळ थांबायला हवा. कारण या सत्तासंघर्षात नेत्यांची शक्ती खर्च होते, पण त्याची किंमत शहराच्या विकासाला चुकवावी लागते.

रस्ते, पाणी, रोजगार, उद्योग, तरुणांच्या संधी—हे प्रश्न अजूनही उत्तरांच्या प्रतीक्षेत आहेत.  जनतेला नेत्यांच्या एकत्र बसण्याचे फोटो नकोत; त्यांना एकत्र काम करण्याचे परिणाम हवे आहेत.पहाट पाडव्याच्या निमित्ताने उभारलेली ही गुढी फक्त परंपरेची राहू नये, तर ती सलोखा, समन्वय आणि विकासाची प्रतिकात्मक सुरुवात ठरावी, अशी अपेक्षा नागरिक, व्यापारी आणि तरुणवर्गातून व्यक्त होत आहे.

आज व्यासपीठावर दिसलेली जवळीक जर खऱ्या अर्थाने कृतीत उतरली, तर कोपरगावचा विकास वेगाने धावू शकतो. अन्यथा हे सगळं केवळ “कार्यक्रमापुरतं एकत्र येणं” आणि “निवडणुकीत पुन्हा तुटणं” या चक्रातच अडकून राहील.

नेत्यांनी ठरवायचं आहे—राजकारणासाठी जनता की जनतेसाठी राजकारण?

 

चौकट 

व्यासपीठावरची हसरी जवळीक जर फक्त फोटोपुरतीच असेल, तर ती जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरते. निवडणुकीत द्वेषाची बी पेरायची आणि कार्यक्रमात मैत्रीची फुले दाखवायची—हा दुटप्पीपणा आता नागरिक ओळखू लागले आहेत. कोपरगावला दिखाव्याचा सलोखा नको, तर कामातून दिसणारी एकजूट हवी. अन्यथा ही गुढीही फक्त प्रतीकच राहील, परिवर्तन नाही.”

 

Leave a Reply

You cannot copy content of this page