३५ लाखांत रस्ता की जनतेची फसवणूक? – निधी वाढवा, नाहीतर शिवसेना स्टाईल आंदोलन! -गगन हाडा

३५ लाखांत रस्ता की जनतेची फसवणूक? – निधी वाढवा, नाहीतर शिवसेना स्टाईल आंदोलन! -गगन हाडा

A Road for ₹35 Lakhs, or a Deception of the Public? – Increase the Funding, or Face a ‘Shiv Sena-Style’ Protest! – Gagan Hada

मोहिनीराजनगर रस्त्यावर ठाकरे गटाचा थेट इशारा; ५० लाख वाढीची मागणी, कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 27Fir.19.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : मोहिनीराजनगर येथील रस्त्याच्या कामावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आक्रमक भूमिका घेत नगरपरिषदेला थेट इशारा दिला आहे. अवघ्या ३५ लाख रुपयांच्या निधीत छोट्या पुलापासून शिवाजीराव शिंदे वस्तीपर्यंत रस्ता होणे अशक्य असल्याचे सांगत, ही केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक असल्याचा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे सेनेचे शहर प्रमुख गगन हाडा यांनी ‌केला आहे.

नगराध्यक्षांनी उशिरा का होईना कामाला सुरुवात केली, याचे स्वागत करतानाच ठाकरे गटाने या कामाच्या वास्तवावर बोट ठेवले आहे. २०२३ च्या इस्टीमेटनुसार मंजूर निधी आणि आजच्या वाढलेल्या दरपत्रकात मोठी तफावत असून, ३५ लाखांत दर्जेदार रस्ता होणे शक्य नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. खड्डे खोदणे, मोठी खडी टाकणे, रोलिंग व मुरूम टाकणे या सर्व प्रक्रियेसाठी मोठ्या निधीची गरज असताना नगरपरिषद ‘घिसडघाई’ करत असल्याचा आरोपही करण्यात आला.

या नादुरुस्त रस्त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, हाणामारीच्या घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरात कोट्यवधींचे रस्ते टिकत नसताना ३५ लाखांत काय चमत्कार होणार, असा सवालही ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

या प्रभागातील मतदारांनी मोठ्या आघाडीने निवडून दिलेल्या सत्ताधाऱ्यांनी आता त्यांचे ‘ऋण’ फेडावे, अशी आठवण करून देत, किमान ८० लाखांचा खर्च अपेक्षित असल्याने तत्काळ ५० लाखांची वाढीव तरतूद करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पुन्हा ‘मागचे पाढे पंचावन्न’ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वीही या रस्त्यासाठी निधी मंजूर होऊनही दर्जाहीन काम झाल्याची उदाहरणे देत, नागरिकांची पुन्हा फसवणूक होऊ देणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

“निधी वाढवा, दर्जेदार रस्ता द्या; अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन अटळ!” असा स्पष्ट इशारा शहरप्रमुख गगनभैय्या हाडा यांनी देत प्रशासनाला धारेवर धरले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page