प्रोटोकॉलचा भंग; कोपरगाव बाजार समितीच्या कार्यक्रमावर बहिष्कार!
Protocol Violation: Boycott of Kopargaon Market Committee Event!
पालकमंत्र्यांचे नाव डावलले, ज्येष्ठांचा अवमान; सत्तेच्या अहंकारावर उपसभापती-संचालकांचा रोष
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 28Sat.18.40 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने रविवारी (दि.२९) आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या भूमिपूजन व विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यावर राजकीय वादाची काळी छाया पडली असून, प्रोटोकॉलचा भंग आणि ज्येष्ठ नेत्यांचा अवमान केल्याच्या आरोपावरून उपसभापती व संचालकांनी थेट बहिष्काराचा इशारा दिला आहे.
राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते दुपारी १.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव प्रोटोकॉलनुसार नमूद करण्यात आले नाही, हा वादाचा मुख्य ठरला. त्याचबरोबर माजी आमदार अशोकराव काळे यांचा ज्येष्ठतेनुसार सन्मानपूर्वक उल्लेख न करता केवळ औपचारिकता म्हणून दुय्यम स्थान देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या उपसभापती व संचालकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे थेट भूमिका जाहीर करत, “हा प्रकार केवळ दुर्लक्ष नसून सत्तेच्या अहंकारातून केलेला जाणीवपूर्वक अवमान आहे,” असा घणाघात केला. कार्यक्रमाचे नियोजन करताना उपसभापती, विद्यमान सदस्य आणि संबंधित घटकांना पूर्णपणे डावलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
“राजकीय हव्यासापोटी सत्तेचा गैरवापर करून बाजार समितीचे सभासद, शेतकरी, व्यापारी, हमाल आणि मापाडी यांची दिशाभूल करण्यात आली आहे. हा प्रकार निषेधार्ह असून आम्ही या कार्यक्रमावर जाहीर बहिष्कार टाकत आहोत,” अशी ठाम भूमिका पत्रकात मांडण्यात आली आहे.
या निषेधाचे लेखी पत्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जयकुमार रावल, आमदार आशुतोष काळे यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. या पत्रावर उपसभापती गोवर्धन परजणे यांच्यासह संचालक संजय शिंदे, राजेंद्र निकोले, रामदास केकाण, शिवाजीराव देवकर, ऋषिकेश सांगळे, खंडू फेपाळे आणि लक्ष्मण शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, बाजार समितीच्या सत्तासमीकरणात सभापती भाजपच्या कोल्हे गटाचे तर उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे असल्याने या वादाला स्पष्ट राजकीय किनार लाभली आहे. प्रोटोकॉल डावलण्याच्या मुद्द्यावरून पेटलेला हा वाद आता उघड राजकीय संघर्षात परिवर्तित झाला असून, कोपरगावच्या राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे.
Post Views:
2





