वृत्तवेध ऑनलाईन। 10 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 17:45
कोपरगाव : उद्योग व्यवसाय नुकतेच रुळावर आले असून आता अर्थ चक्राला गती देण्याची वेळ आहे. ‘लॉकडाऊन’ हा पर्याय नसून पालिका प्रशासनाने जनजागृतीवर तर पोलिसांनी कडक कारवाई करण्यावर भर द्यावा, मात्र नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, हा आग्रह कायम राहणार असल्याचा सूर आता सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे.
पावसाळी वातावरण असल्यामुळे साथीचा रोगाचा प्रादुर्भाव व कोरोनाची लक्षणे सारखीच असल्याने शहरी व ग्रामीण भागात वाढलेली कोरोना रूग्ण संख्या कमी करण्यावर भर देण्यात यावा. ‘लॉकडाऊन’ हा पर्याय नसून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यास कोरोना नियंत्रणात येऊ शकतो. पालिकेने साथीच्या काळात स्वच्छतेसाठी खासगी एजन्सीमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. उद्योग व्यवसाय नुकतेच रुळावर आले असून आता अर्थ चक्राला गती देण्याची वेळ आहे. सणावारांचे दिवस आले आहेत. तेंव्हा आता सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उद्योगांना व दुकानांना व्यवसाय करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी आता नागरिकातून दिसून येत आहे. आपल्याला आता कोरोनाला घाबरून चालणार नाही, तर कोरोनाबरोबर राहण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. रेशन दुकानासमोरील रांगा आणि सामाजिक अंतराचा उडालेला बोजवारा पाहिला की, असे वाटते कोरोनाच्या भिती पेक्षा यापेक्षा पोटाची खळगी भरणे किती महत्त्वाचे आहे हे सत्य कळुन येते.
लॉकडाऊन उठल्यानंतर ही अजून रिक्षावाले, हॉटेलवाले, फेरीवाले, सलून वाले त्यांच्याकडे पाहिले कोरोनाच्या भितीपेक्षा त्यांच्या डोळ्यात संसाराची रोजी होणारी ससेहोलपट दिसून येते कोरोनाने एकदाच मरू पण हे “आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना” असे रोजचे मरणे आता नको, अशी त्यांची मानसिकता झाली आहे. त्यात पुन्हा लॉकडाऊन म्हणजे त्यांच्या दुःखावर डागण्या देणे असे ठरेल. लॉकडाऊनला आता आमचा पाठिंबा नाही, आता आम्हाला लॉकडाऊन नको आणि कोरोनाला आम्ही हरविले आहे. आम्हाला लॉकडाऊन पुर्वीचे जनजीवन जगू द्या, असे आता प्रशासनाला ओरडून सांगावेसे वाटते .
लॉकडाऊनचे दोन- अडीच महिने संपले आणि पुन्हा एकदा सर्वांनी नवी सुरुवात केली; पण पुन्हा लॉकडाऊन सुरू झाला तर आमच्या व्यवसायाची सावरू पाहणारी घडी पुन्हा विस्कटली, अशी व्यथा छोट्या व्यावसायिकांनी व्यक्त केली. रिक्षा, गॅरेज, इस्त्रीवाले, मेसचालक, स्टेशनरी, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम मजूर यांचे काम लॉकडाऊनच्या मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा सुरू झाले होते. जे काही थोडेफार पैसे मिळायचे त्यातून कसा तरी घरगाडा चालतो आहे. पण आता पुन्हा लॉकडाऊन म्हणजे सर्वकाही ठप्प होणार आहे.
हप्ते थकले, उत्पन्न थांबले !
रिक्षा सुरू झाली तर थोडेसे हायसे वाटले होते. दिवसाला फार काही ग्राहक होत नव्हते. तरी पण जे काही पैसे दिवसाकाठी मिळायचे त्याने दोन-चार दिवसांच्या भाजीपाल्याचा खर्च तरी नक्कीच भागायचा. रिक्षाचे कर्ज डोक्यावर आहे. हप्ते थकल्याने आता बँकेवाले मागे लागले आहेत. व्याज वाढत आहे. घरभाडेही देता येत नाही. गाडीचे पासिंग विमा थकला आहे मग आता करावे काय, असा प्रश्न पडला आहे. आता पुन्हा लॉकडाऊन नको – रिक्षाचालक
अडीच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे आधीच व्यवसायाचे खूप नुकसान झाले आहे. अनेकांना दुकानाचे भाडे भरणे कठीण झाल्याने त्यांनी सलूनचे सगळे सामान घरातच आणून ठेवले आहे. कुटुंबाचा खर्च भागविणे दिवसेंदिवस जड जात असताना पुन्हा लॉकडाऊन झाले की सगळे शांत होणार . आता मात्र लॉकडाऊन नकोच .- सलून व्यावसायिक
वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर म्हणतात , कोरोनामुळे चार महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम भयंकर आहे. लोकांवर उपासमारीची वेळ आली. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ पाच टक्के लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे, त्यामुळे त्यांच्यावर लक्ष केंद्रीत त्यांना सर्व प्रकारचे उपचार दिले पाहिजेत. पण त्यासाठी ९५ टक्के नागरिकांना का वेठीस धरले जात आहे. केंद्र व राज्यातील सरकार लॉकडाऊनच्या चक्रामध्ये अडकले आहे. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आता जनतेनेच सरकारला मार्ग दाखवावा.
सरकारने आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करून लोकांना सण साजरे करू द्यावेत. रिक्षा, दुकाने, टपऱ्या बस अशा सगळ्याच प्रकारच्या व्यवस्था आता पहिल्या प्रमाणे निर्माण व्हायला पाहिजेत.म्हणून लॉकडाऊनला पाठींबा नाही. लाकडाऊनमुळे राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. ती रुळावर आणण्याची जबादारी सरकारची नाही, तर लोकांचीच आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन पाळू नका, दुकाने, व्यवहार, उद्योग सुरू करा. स्वतःला वाचवण्यासाठी सरकारच्या नियमांचे पालन करून जनजीवन सुरळीत करावेच लागेल. म्हणून आमचा लॉकडाऊनला यापुढे पाठिंबा असणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नगरसेवक कैलास जाधव यांनी लॉकडाऊनला तीव्र विरोध दर्शविला आहे.कोपरगाव तालुक्याची जबाबदारी तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यावर आहे इतरांनी यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये. जो काही निर्णय घ्यायचा आहे ते हे अधिकारी घेतील ते सक्षम नाही आहेत हे त्यांनी चार महिन्यात दाखवून दिलेले आहे तेव्हा इतरांनी त्यात हस्तक्षेप करू नये, आणि अधिकाऱ्यांनीही तो खपवून घेऊ नये बैठका घेऊन पब्लिक प्रेशर आणून मनासारखे निर्णय घेण्यास कोणी कोणाला भाग पाडू नये अशी चर्चा आता नागरिकात सुरू आहे. याबाबत अनेकांनी वरील महसूल, पालिका, व पोलीस प्रशासन या तीनही अधिकाऱ्यांकडे तक्रारीही केल्या आहेत. तेंव्हा लॉकडाऊन नको , जनतेला मान्य नाही, भरीस पाडू नका !