आसमानी आणि सुलतानी या दोन्ही संकटामुळे शेती हा शेतकऱ्यांसाठी जीवघेणा जुगार ठरतो आहे.!

आसमानी आणि सुलतानी या दोन्ही संकटामुळे शेती हा शेतकऱ्यांसाठी जीवघेणा जुगार ठरतो आहे.!

(Sanday Special)

कांदा गडगडला, दूध नासले,
डाळिंबाला झाला ‘तेल्या’ ;
विमा नाही,अनुदान नाही शेतकरी त्रासले !

कोपरगाव जेऊर कुंभारी येथील डाळिंब उत्पादक शेतकरी सुभाष आव्हाड

वृत्तवेध ऑनलाईन | 15 Aug 2020,

Story By : RajendraSalkar 16:00

कोपरगाव : आसमानी आणि सुलतानी अशी दोन्ही संकटे एकाचवेळी कोसळली तर शेतकऱ्याचे भवितव्यच धोक्यात येते. हे चित्र सध्या देश व राज्यभर दिसत आहे  कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आर्थिक घडी विस्कटली , जगण्याच्या वाटा मर्यादीत झाल्या, तर दुसरीकडे कांदा गडगडला, दुधाला भाव नाही शेती मालाला उठाव नाही, जगाचा पोशिंदा शेतकरी हवालदिल झाला आहे. हे चित्र सध्या देश व राज्यभर दिसत आहे. दुर्दैवाने कोपरगाव तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी अशाच आसमानी आणि सुलतानी संकटातून जाताना दिसून येतात. ‘तेल्या’ व काळे डाग हे या संकटाचे नाव!

डाळिंबाला अधूनमधून ग्रासणाऱ्या तेल्या रोगाने आता पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तेल्या रोगाने डाळिंबाला ग्रासले असून त्यात कोणताही दिलासा मिळण्याऐवजी उलट, त्यात उत्तरोत्तर वाढ होत चालल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी अक्षरश: हतबल झाला आहे.
तेल्या आणि काळ्या डागामुळे डाळींब झाडाची फळे गळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पिक विमा नाही, सरकारचे लक्ष नाही, यामुळे अतिशय वाईट अवस्था डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची झाली असल्याची प्रतिक्रिया कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे सर्वे नंबर ४३ मध्ये ३ एकर डाळिंबाची बाग असलेले डाळिंब उत्पादक शेतकरी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक सुभाषराव आव्हाड यांनी आमचे प्रतिनिधी जवळ व्यक्त केली.

शेती हा शेतकऱ्यांसाठी जुगार ठरतो, असे नेहमीच म्हटले जाते. पुरेसा पाऊस व अनुकूल हवामानाची साथ असल्यास मोठय़ा काबाड कष्टाने लागवग केलेली पिके हाती येतात. परंतु त्याचवेळी कृषी बाजारपेठांमध्ये मालाला अपेक्षित उठाव असेल तर शेतक ऱ्याला खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस येतात. शेतीमालाचे उत्पादन जास्त झाले आणि उत्पादनाचे दर कोसळले तर शेतक ऱ्याला मोठा फटका बसतो. या चक्रव्यूहातून शेतकऱ्याची सहजासहजी सुटका होत नाही. अलीकडे शेती उत्पादन खर्च वाढला असताना तेवढय़ा प्रमाणात उत्पन्न मिळत नाही, असा शेती क्षेत्रातील सार्वत्रिक निराशेचा सूर ऐकायला मिळतो.

डाळिंब उत्पादक शेतकरी अक्षरश: हतबल झाला आहे. काही शेतकऱ्यांवर तर डाळिंबाच्या बागाच काढून टाकण्याइतपत संकट ओढवले आहे. तेल्या रोग आटोक्यात आणायचा तर त्यासाठी औषधांची मोठय़ा प्रमाणात फवारणी करून बागांची निगा राखावी लागते. महागडी औषधे खरेदी करून योग्य नियोजनाद्वारे फवारणी करणे हे सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरची बाब आहे. त्यासाठी कर्ज काढून बागा वाचविण्याचे प्रयत्न सुरू असले तरी शेवटी नशिबात काय लिहून ठेवले आहे, याची शाश्वती नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक व मानसिक तणावाखाली असल्याचे चित्र कोपरगाव तालुक्यातील काही भागात दिसून येते.

कांदा उत्पादक शेतकरी व दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. मात्र सरकार कोरोनाच्या नावाखाली या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करतांना शेतकऱ्यांना अनुदान नाही, पिकविमा लाखो रुपयांचे कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून फळबाग लागवड केली. मात्र डाळिंबाला भाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे. डाळिंबावर तेल्या रोगाने आक्रमण केले . तर फळांवर पडलेल्या काळ्या टिपक्याने डाळिंब उकिरड्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. परंतु तरी देखील शेतकऱ्यांची दया सरकारला येत नाही.तीन वर्षांपूर्वी लावलेले डाळिंबाचे बाग आता आम्ही तोडणार आहोत असे डाळिंब उत्पादक शेतकरी सुभाषराव आव्हाड यांनी सांगितले.
शेतकरी सुभाष आव्हाड यांनी १७ एकर  कांद्याचे पीक घेतले होते. डाळिंब बागेसाठी त्यांना यावर्षी ३ लाख रुपये खर्च आला होता तर ८ लाख रुपये खर्चून त्यांनी १७ एकर कांदे केले होते. परंतु अवकाळी पाऊस व मार्केटला कोरोना व्हायरसमुळे मागणी नसल्याने कांदा तर माती मोलच विकावा लागला. डाळिंबाचे पैसे हाती लागतील म्हणून डाळिंबावर खर्च केला मात्र तेथेही चित्र उलटे झाले. तेल्या रोग व काळ्या टिपक्याने उभ्या असलेल्या डाळिंबांची फळे गळून पडली. बागेतच पडलेला फळांचा खच पाहून मन मात्र हेलावून गेले. खरच शेतकऱ्यांचा वाली कोणीच नाही अशी भावनाच शेतकऱ्यांची झाली.चालू वर्षी आव्हाड यांचा झालेला खर्च या पिकातुन निघणार नसून त्यांना जवळपास ७ लाख रुपये तोटा होणार आहे.

अवकाळी पावसाने मागच्या वर्षी आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले. त्यांना पंचनाम्याचे पैसेही मिळाले मात्र आव्हाड यांच्या हाती काहीच आले नाही. ज्यांनी पिक विमा काढला त्यांना पीक विम्याचे पैसे मिळतील म्हणून त्यांनी कंपनीकडे पीक विम्याची मागणी केली मात्र त्या खासगी कंपनीने ही त्यांची दखल घेतली नाही.त्यांनी दूध धंदाही वाढवला मात्र दुधाचे दरही कमी झाले. गाईचा चारा व खाद्य वगळता हातात दमडीही शिल्लक राहत नाही.
कोपरगाव तालुक्यात प्रगतशील शेतकरी म्हणून आव्हाड यांची ओळख आहे. सदन शेतकऱ्यांवर ही वेळ येत असेल तर अल्पभूधारक शेतकऱ्यांची परिस्थिती याच्याही पेक्षा कठीण झाली आहे.खर्च करून शेतीतून उत्पन्न मिळते मात्र उत्पादीत झालेल्या मालाला भाव मिळत नसेल तर शेती कसवायची का प्रश्नही सुभाषराव आव्हाड, सतीश आव्हाड, तुळशीराम आव्हाड यांनी उपस्थित केला.आतातरी महाराष्ट्र सरकारने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला द्यावेत व नुसकान भरपाई मिळवून द्यावी अशी कळकळीची मागणीही त्यांनी केली.

आपण शेतकर्‍याला बळीराजा म्हणतो परंतु वस्तुस्थिती पाहिल्यानंतर शेती हा शेतकऱ्यांसाठी जीवघेणा जुगार ठरतो असल्याचे दिसून येत आहे, आपला देश कृषिप्रधान असल्याने याकडे अतिशय गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे

आज कांदा गडगडला, दूध नासले,
डाळिंबाला झाला ‘तेल्या’ ; विमा नाही, अनुदान नाही शेतकरी त्रासले !

केवळ तुटपुंजी मदत व अनुदाने देऊन दरवर्षी सरकारी तिजो-या खाली करून एक वेळ राजकीय पक्षांच्या मतांची बेरीज वाढेल परंतु हे प्रश्न सुटणार नाहीत अस्मानी-सुलतानी या दोन्ही संकटातून शेती उर्जित अवस्थेत आणण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर संशोधन व काम करण्याची गरज आहे !

Leave a Reply

You cannot copy content of this page